ऑनलाइन लोकमत
धारवाड (कर्नाटक), दि. ३० - महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या हत्येचे गुढ उकलण्यात अपयश येत असतानाच कर्नाटकमध्ये कन्नड विचारवंत एम एम कलबुर्गी यांची रविवारी सकाळी अज्ञात व्यक्तींनी गोळी झाडून हत्या केली. साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते.
धारवाड येथे राहणारे ७७ वर्षीय एम एम कलबुर्गी रविवारी सकाळी घराबाहेर पडत असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात कलबुर्गी यांचा मृत्यू झाला. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कलबुर्गी हे हम्पी विद्यापीठाचे माजी कुलगुरु असून हिंदू धर्माचा अतिरेक व मूर्तीपुजेला विरोध केल्याने त्यांच्यावर हिंदूत्ववाद्यांनी जोरदार टीका केली होती.