नवी दिल्ली - आपल्या एकाच भाषणानंतर देशभर प्रसिद्धीस आलेले लदाखचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांच्या पत्नीने कन्हैय्याकुमार यास क्लिनचीट दिली आहे. खासदार जामयांग यांच्या पत्नीही दिल्ली विद्यापीठाच्या माजी विद्यार्थीनी आहेत. विशेष म्हणजे, ज्यावेळी दिल्ली विद्यापीठात घोषणाबाजीचा प्रकार घडला. त्यावेळी, त्या विद्यापीठातच होत्या. तर, कन्हैय्या कुमार तेथे उपस्थित नव्हता. केवळ, विद्यार्थी संघटनेचा नेता असल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. जे घडलं ते चुकीचं घडलं, असं जामयांग यांच्या पत्नीनं म्हटलं आहे.
कन्हैय्या कुमारसोबत चुकीचं घडलं, तसेच उमर खालिद यांच्याही बाबतीत चुकीचं घडलं आहे. तेव्हापासून त्यांची प्रतिमा खराब बनली असून लोक त्यांना नावं ठेवतात. माझा एक भाऊही जो, जनावरांचा डॉक्टर आहे, तोही न्यूज चॅनेल्सवर कन्हैय्या कुमारला पाहिल्यानंतर त्याला दोषी मानतो, सर्वसामान्य जनतेला जे दाखवलं ते चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आलं, असे खासदार जामयांग यांच्या पत्नीने एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले. म्हणजेच, एकप्रकारे जामयांग यांच्या पत्नीने कन्हैय्या कुमारला क्लीनचीट दिली आहे.
मोदी सरकारनं जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवलं असून, जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याचे प्रस्तावित विधेयक सोमवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. त्यानंतर लोकसभेत कलम 370 वर वादळी चर्चा झाल्यानंतर हे विधेयक 351 विरुद्ध 72 मताधिक्याने पारित झाले. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारचा ऐतिहासिक विजय झाला आहे. यादरम्यान लडाखचे भाजपाचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनी जोरदार भाषण केलं. लोकसभेत 370वर झालेल्या वादळी चर्चेत त्यांच्या भाषणानं सगळेच प्रभावित झाले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता.