नवी दिल्ली : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हरयाणाच्या हिसारमधील यू-ट्युबर ज्योती मल्होत्रा हिची राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए), आयबी, मिलिटरी इंटेलिजेंस आणि अन्य संस्थांकडून कसून चौकशी केली जात आहे.
पाकिस्तानमधील गुप्तचर संस्थेचे कोणते अधिकारी तिच्या संपर्कात होते आणि त्यांच्याकडून भारताबद्दल कोणत्या प्रकारची माहिती मागितली जात होती, याची माहिती तिच्याकडून घेतली जात आहे. रविवारी रात्री उशिरा १:४५ वाजता पोलिस ज्योती मल्होत्राला घेऊन तिच्या घरी गेले आणि घरातून काही कागदपत्रे जप्त केली. पोलिस तेथे १५ मिनिटे होते. याशिवाय, तिच्या मोबाईल आणि लॅपटॉपचा डेटा लॅबमध्ये तपासला जात आहे. तिने काही डाटा डिलिट केला असून तो डाटा परत मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी तिला पाकिस्तानची प्रतिमा चांगली दाखविण्यास सांगितले होते, असे तिने चौकशीत सांगितले आहे.
इन्स्टाग्राम अकाउंटवर ३.७७ लाख सबस्क्रायबर्स पहलगाम हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वी ज्योती पाकिस्तानला गेली होती. यानंतर ती पहलगाम, गुलमर्ग, दल लेक, पँगोंग लेक अशा ठिकाणी गेली. पँगाँग लेक चीनच्या एलएसी सीमेजवळ आहे. यामुळे ज्योती एजंसीच्या रडारवर आली. सध्या ज्योती मल्होत्राचे इन्स्टाग्राम अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहे. ज्योतीच्या इन्स्टाग्राम अकाउंटचे ३.७७ लाख सबस्क्रायबर्स व १.३३ लाख फॉलोअर्स आहेत.
हरकिरत सिंगने करून दिली दानिशशी ओळखहरियाणा शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे सदस्य हरकिरत सिंगने ज्योती मल्होत्राची ओळख पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकारी अहसान-उर-रहीम उर्फ दानिशशी करून दिल्याचे तपासात समोर आले आहे. हरकिरतने व्हिसा मिळाल्यानंतर ज्योती मल्होत्राला एका जत्थ्यासोबत पाकिस्तानला पाठविले होते. सध्या पोलिसांनी हरकिरतचा मोबाईल जप्त केला होता. गरज पडल्यास त्यालाही अटक केली जाऊ शकते.
ज्योतीचा परदेश प्रवास : आयबीनुसार, ज्योती दिल्लीहून एका शीख जत्थ्यासह दोनदा पाकिस्तानला आणि एकदा एकटीच कर्तारपूर साहिब गुरुद्वाराला गेली आहे. तिने दुबई, थायलंड, इंडोनेशिया, नेपाळ, भूतान, चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशचा प्रवास केला आहे.
तपासातून झाला पर्दाफाश आतापर्यंतच्या तपासात आरोपींनी अत्यंत संवेदनशील अशी माहिती पाकच्या आयएसआय या गुप्तहेर संस्थेच्या हस्तकांना पुरवल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व आरोपींच्या आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी केली जात आहे, तसेच त्यांच्याकडील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे न्यायवैद्यक विश्लेषण केले जात आहे.