हरियाणाच्या हिसारमध्ये ३३ वर्षीय युट्यूबर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोपात अटक केली आहे. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनंतर ज्योतीला अटक करण्यात आली. ज्योती तिच्या एका व्हिडिओत नवी दिल्लीतील पाकिस्तानी दूतावास कार्यालयात आयोजित इफ्तार डिनरमध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले होते. हा व्हिडिओच तिचे पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत संबंध असल्याचे पुरावे बनले. ज्योती पाकिस्तानी दूतावास कार्यालयातील एहसान उर रहीम उर्फ दानिश याला भेटायला जात होती.
दानिशला हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली १३ मे रोजी देशातून हकालपट्टी केली होती. मार्च २०२४ साली ज्योतीने एक व्हिडिओ अपलोड केला होता. ज्यात ती नवी दिल्लीत पाकिस्तानी दूतावास कार्यालयात गेली होती. त्यात तिने पाकिस्तानचा दौरा आणि व्हिसा मिळवण्याची इच्छा व्यक्त केली होती. या व्हिडिओत तिच्यासोबत एहसान उर रहीम उर्फ दानिश दिसत होता. ज्योती आणि दानिश यांच्यातील संवाद पाहता दोघेही एकमेकांना आधीपासून ओळखत असल्याचं स्पष्ट झाले.
कोण आहे एहसान उर रहीम उर्फ दानिश?
एहसान उर रहीम उर्फ दानिश पाकिस्तानी दूतावास कार्यालयातील एक अधिकारी आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणेनुसार, दानिशवर हेरगिरीचा आरोप लागला होता. भारताची संवेदनशील माहिती तो लीक करत होता. ज्यात भारतीय सैन्याच्या हालचालींचा समावेश होता. त्याच्या या प्रकारामुळे भारत सरकारने पर्सोना नॉन ग्राटा घोषित करत त्याला १३ मे २०२५ रोजी २४ तासांत भारत देश सोडण्याचे आदेश दिले होते. तपासात ज्योती मल्होत्रा पहिल्यांदा २०२३ साली पाकिस्तान दौऱ्यावर गेली होती. तिथे तिची मुलाखत दानिशसोबत झाली. भारतात परतल्यानंतर ती दानिशच्या संपर्कात होती.
दानिशच्या शिफारशीनंतर ती दुसऱ्यांदा पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेली. जिथे तिची ओळख अली अहसानसोबत झाली. अलीने ज्योतीच्या पाकिस्तानात राहण्याची आणि फिरण्याची व्यवस्था केली. तिला पाकिस्तानी गुप्तचर अधिकारी शकीर आणि राणा शाहबाजला भेटवले. ज्योतीने जट रंधावा नावाने शकीर यांचा नंबर सेव्ह केला होता. ज्योतीने ४ वेळा पाकिस्तान दौरा केला. त्यात २०२३ साली दोनदा ती पाकिस्तानात गेली. ज्योतीचे पाकिस्तानी गुप्तचर एजेंटसोबत चांगले संबंध होते, त्यातून त्याच्यासोबत ज्योती बाली, इंडोनेशिया दौऱ्यावर गेली होती.