इटानगर : मी नेहमीच विकेंद्रीकरणाचा कट्टर समर्थक राहिलो आहे. न्याय हा लोकांच्या दारापर्यंत पोहोचला पाहिजे. सत्तेच्या केंद्रापुरता मर्यादित राहू नये, असे मत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले.
गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या इटानगर येथील खंडपीठाच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर एका कार्यक्रमात ते बोलत होते. सरन्यायाधीश गवई म्हणाले की, न्यायपालिका, कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ केवळ लोकांची सेवा करण्यासाठी आणि जलद आणि कमीत कमी खर्चात न्याय मिळावा यासाठी आहेत.
ते म्हणाले की, न्यायालये, न्यायपालिका किंवा कायदेमंडळ हे राजघराण्यातील सदस्यांसाठी, न्यायाधीशांसाठी किंवा कार्यपालिकेच्या सदस्यांसाठी नाहीत. आम्हा सर्व लोकांना न्याय देण्यासाठी आहेत. न्याय अधिक सुलभ बनविल्याबद्दल त्यांनी गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या आतापर्यतच्या मुख्य न्यायाधीशांचे कौतुक केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भदेत सरन्यायाधीश गवई म्हणाले की, डॉ. बाबासाहेब भारताच्या एकतेचे कट्टर समर्थक होते. ते नेहमीच म्हणायचे, भारत प्रथम आणि अंतिमतः भारतच.