जम्मू/श्रीनगर : जम्मू-काश्मिरात नव्या सरकारच्या स्थापनेबाबत अनिश्चितता कायम असतानाच राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी शुक्रवारी रात्री या संदर्भात चर्चा करण्यासाठी पीडीपी आणि भाजपा यांना आमंत्रित केले. विधानसभा निवडणुकीनंतर पीडीपी सर्वांत मोठा पक्ष तर भाजपा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. परंतु विधानसभेत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही.राज्यपाल व्होरा यांनी पीडीपीचे संरक्षक मुफ्ती मोहम्मद सईद आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जुगलकिशोर यांना ‘सरकार स्थापन करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी’ वेगवेगळे पत्र पाठविले आहे, अशी माहिती राजभवनच्या अधिकाऱ्याने दिली. ८७ सदस्यीय विधानसभेत भाजपाला २५ जागा तर पीडीपीला २८ जागा मिळालेल्या आहेत. निकाल जाहीर झाल्यापासून हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याची शक्यता पडताळून पाहत आहेत; परंतु या दोन्ही पक्षांतील या चर्चेत किती प्रगती झाली हे मात्र समजले नाही. दरम्यान १२ आमदार असलेला काँग्रेस आणि १५ आमदार असलेला नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पीडीपीला पाठिंबा देण्याचे आपण केवळ मौखिकरीत्या सांगितलेले आहे, असे टिष्ट्वट नॅशनल कॉन्फरन्सचे कार्यकारी अध्यक्ष आणि मावळते मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी केले आहे. भाजपाशी कोणताही सौदा झालेला नाही, असे त्यांनी याआधीच स्पष्ट केले होते. भाजपा प्रादेशिक पक्षांना संपविण्याचा प्रयत्न करीत आहे आणि राज्याच्या जनतेने दिलेल्या जनादेशाबद्दल भाजपा संवेदनशील नाही, असा आरोप काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केला. काँग्रेस आणि काही अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर पीडीपी ४४ आमदारांचे संख्याबळ जमविण्यात यशस्वी राहील, असे पीडीपीच्या एका नेत्याने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पीडीपी आणि सहा अपक्ष आमदारांच्या संपर्कात असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते सलमान निजामी यांनी म्हटले आहे. परंतु सरकार स्थापन करण्यासाठी भाजपा सर्वच पक्षांसोबत चर्चा करीत असल्याचे भाजपाचे सरचिटणीस राम माधव म्हणाले. (वृत्तसंस्था)
जम्मू-काश्मिरात पेच कायम
By admin | Updated: December 27, 2014 00:30 IST