पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तान भयभीत झाला आहे. पाकिस्तानला सध्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. एका बाजूला भारताने पाकिस्तान विरोधात अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. तर आता दुसरीकडे पाकिस्तानला नैसर्गिक प्रकोपाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. काश्मीरमधील मुसळधार पावसामुळे पीओकेमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे.
चिनाबची पाणी पातळी वाढली -जम्मू आणि काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये शुक्रवारी (२ मे २०२५) झालेल्या मुसळधार पावसामुळे चिनाब नदीची पाणी पातळी वाढली आहे. यामुळे पाकिस्तानच्या अनेक भागांत पुराचा धोका निर्माण झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १ ते ६ मे दरम्यान जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे (४०-६० किमी/ताशी) वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी झेलमला आला होता पूर - माध्यमांतील वृत्तांनुसार, गेल्या महिन्यात (२६ एप्रिल २०२५), भारताने पाकिस्तानातील मुझफ्फराबाद येथील हट्टिन बाला भागात झेलम नदीत पाणी सोडले होते. यामुळे मुझफ्फराबादमध्ये अचानक मोठा पूर आला होता. यानंतर, मुझफ्फराबाद प्रशासनावर वॉटर इमर्जन्सी जाहीर करण्याची वेळ आली होती. उरी येथील अनंतनाग जिल्ह्यातून चकोठीमध्ये पाणी शिरल्याने झेलम नदीला अचानक पूर आला होता. यामुळे येथील स्थानिक लोकांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर निर्णय घेतले आहेत -पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने सिंधू पाणी करार स्थगित करण्यासह अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. पाकिस्तान सध्या एवढा घाबरला आहे की, तो संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेकडे भारतापासून वाचवण्याची विनंती करत आहे.