जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. यातच माजी मुख्यमंत्री तथा जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे (जेकेएनसी) अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी, या हल्ल्याचा निषेध केला असून लोकांना दहशतवादाविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तसेच, हल्ल्यात सहभागी असलेले मानवतेचे शत्रू असून ते नरकात कुजतील, असेही फारुख अब्दुल्ला म्हणाले. यावेळी त्यांनी सिंधू पाणी करारावरही भाष्य केले.
फारुख अब्दुल्ला यांनी पोनी राईड ऑपरेटरला वाहिली श्रद्धांजली -फारुख अब्दुल्ला पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या आदिल हुसेन शाहच्या घरी पोहोचले. येथे त्यांनी आदिलच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्याला श्रद्धांजली वाहिली. आदिल पोनी राईड ऑपरेटर म्हणून काम करत होता. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २६ जणांमध्ये आदिलचाही समावेश होता. आदिल वगळता सर्वजण पर्यटक होते.
फारुख म्हणाले, आदिल एक शहीद आहे. तो दहशतवाद्यांना घाबरून पळून गेला नाही. तो त्यांच्याशी धैर्याने लढला. हीच तर मानवता आणि काश्मिरीयत आहे.
भारताच्या कारवाईवर मौन, पाकिस्तानला टोमणे -पहलगाम हल्ल्यानंतर, भारताकडून पाकिस्तानविरुद्ध केल्या जात असलेल्या कारवाईसंदर्भात बोलताना फारुख अब्दुल्ला म्हणाले, "यासंदर्भात आपण काहीही बोलणार नही. कारण हा पंतप्रधानांचा अधिकार आहे." मात्र यावेळी त्यांनी पाकिस्तानला फटकारले. "पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुट्टो झरदारी यांच्या धमक्यांवर प्रतिक्रिया देताना फारुख म्हणाले, अशा नेत्यांच्या वक्तव्यांमुळे हा प्रश्न सुटणार नाही. जर आपण त्याच्या विधानांकडे लक्ष दिले तर काश्मीर प्रगती करू शकणार नाही." असे फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
सिंधू पाणी करारासंदर्भात काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? -यावेळी भारताने सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या घेतलेल्या भूमिकेवरीही फारुख अब्दुल्ला यांनी भाष्य केले. ते म्हणाले, या करारात बऱ्याच काळापासून सुधारणा करणे गरजेचे होते. आपल्या नद्यांच्या पाण्यापासून आपण वंचित आहोत. नद्यांवर जलविद्युत निर्मितीच्या मदतीने हजारो मेगावॅट वीज निर्मिती करता येते. पण, पाकिस्तानच्या परवानगीशिवाय हे करता येत नाही. जम्मूला चिनाब नदीचे पाणी मिळू शकत नाही कारण करारात असे नियम आहेत.
भारत हा महात्मा गांधींचा देश -फारुख अब्दुल्ला म्हणाले, भारत हा महात्मा गांधींचा देश आहे, आम्ही पाण्यासंदर्भात पाकिस्तानला निश्चितपणे धमकी दिली आहे. पण त्यांना मारणार नाही. आपण एवढे क्रूर नाही, जेव्हा दोन्ही देशांमध्ये सिंधू पाणी करार झाला तेव्हा जम्मू आणि काश्मीरमधील लोकांना विश्वासात घेतले गेले नाही. यामुळे आजही लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.