Operation Keller: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. याशिवाय जम्मू-काश्मीरमध्येही दहशतवादाविरुद्ध लष्करी कारवाई तीव्र केली आहे. याच पार्श्वभूमीवर शोपियानसह विविध भागात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कराकडून मोहीम राबवली जात आहे.
मंगळवारी(13 मे) सकाळी अशाच एका कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी शोपियानच्या जामपाथरीमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. लष्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठार झालेले दहशतवादी पहलगाम हल्ल्यातील दोषी नव्हते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सुरक्षा दल वेगवेगळ्या ठिकाणी विशेष मोहिमा राबवत आहेत.
मारले गेलेले दहशतवादी कोण होते?मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहिला दहशतवादी शाहिद कुट्टे हा शोपियानमधील छोटीपोरा हिरपोरा येथील रहिवासी होता. तो 2023 मध्ये लष्करमध्ये सामील झाला होता. 18 मे 2024 रोजी शोपियानमधील हिरपोरा येथे भाजप सरपंचाच्या हत्येत त्याचा सहभाग होता. 3 फेब्रुवारी 2025 रोजी कुलगाममधील बेहीबाग येथे झालेल्या टीए कर्मचाऱ्यांच्या हत्येतही त्याचा सहभाग असल्याचा संशय आहे. दुसऱ्या दहशतवाद्याची ओळख अदनान शफी दार अशी झाली आहे. तो शोपियानमधील वंदुना मेल्होरा येथील रहिवासी होता. तो 2024 रोजी लष्करात सामील झाला. 18 ऑक्टोबर 2024 रोजी शोपियानमधील वाची येथे एका मजुराच्या हत्येत तो सहभागी होता.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे फोटो लावलेशोपियानमधील अनेक भागात पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचे पोस्टर्स लावण्यात आले होते. सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांविषयी माहिती देणाऱ्याला 20 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे.