जीसॅट- ६ आज अवकाशात झेपावणार इस्रोचे नवे मिशन : २९ तासांची उलटगणती सुरू
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
चेन्नई : जीसॅट- ६ या अत्याधुनिक दळणवळण उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी इस्रोने बुधवारी २९ तासांची उलटगणती सुरू केली आहे.
जीसॅट- ६ आज अवकाशात झेपावणार इस्रोचे नवे मिशन : २९ तासांची उलटगणती सुरू
चेन्नई : जीसॅट- ६ या अत्याधुनिक दळणवळण उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी इस्रोने बुधवारी २९ तासांची उलटगणती सुरू केली आहे.जीएसएलव्ही- डी ६/ जीसॅट-६ या मिशनच्या उलटगणतीला बुधवारी सकाळी ११.५२ वाजता प्रारंभ झाला. मिशनच्या तयारीचा आढावा घेणारी समिती(एमआरआर) आणि प्रक्षेपण मंजुरी मंडळाने(एलएबी) या उलटगणतीला परवानगी दिल्याचे इस्रोच्या सूत्रांनी सांगितले. गुरुवारी संध्याकाळी ४.५२ वाजता श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून जीएसएलव्ही- डी ६ हे प्रक्षेपक यान जीसॅटसह अवकाशात झेपावेल. जीसॅट- ६ हा भारताचा २५ वा भूस्थिर दळणवळण उपग्रह ठरणार असून जीसॅट मालिकेतील १२ व्या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणातून इस्रोच्या उपक्रमांना नवी झळाळी लाभणार आहे. (वृत्तसंस्था) -------------------------कोणती आहेत वैशिष्ट्ये?जीसॅट- ६ हा उपग्रह एस बॅन्डवरील पाच स्पॉट बीम आणि सी- बँडमधील नॅशनल बीमच्या साह्याने दळणवळणाची अत्याधुनिक सुविधा पुरविणार आहे. या मिशनचे आयुष्य ९ वर्षांचे असेल. या क्युबिक आकाराच्या उपग्रहाचे एकूण वजन २११७ किलो असून त्यात ११३२ किलो इंधन असेल. उपग्रहाचे निव्वळ वजन ९८५ किलो राहील. त्यात घडी न होणारा सहा मीटर व्यास असलेला सी- बँड अँटेना आजवरचा सर्वात मोठा अँटेना ठरणार आहे. भारतीय भूभागावर पाच स्पॉट बीम सोडण्यासाठी या अँटेनाचा वापर केला जाईल. स्पेक्ट्रमच्या वापराची वारंवारिता वाढविण्यासाठी या बीमचा वापर केला जाईल. हसन येथील मास्टर कंट्रोल फॅसिलिटीद्वारे(एमसीएफ) या उपग्रहावर नियंत्रण राखता येऊ शकेल. द्रवरूप ॲपोजी मोटर वारंवार प्रज्वलित करीत कक्षा विस्तार केला जाणार असून अखेरच्या टप्प्यात हा उपग्रह पूर्वेकडे ८३ रेखांशावर वक्राकार भूस्थिर कक्षेत स्थिरावल्यानंतर अँटेना आणि तीन अक्ष काम सुरू करतील.