आयुष्यात अनेक अडचणी येतात. काही लोक या अडचणीतून मार्ग काढतात तर काही त्यांच्यासमोर हार मानतात. अशीच एक संघर्षाची गोष्ट आता समोर आली आहे. वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्याने एक तरूण दहावीत नापास झाला. त्यानंतर कमाईचे कोणतेही साधन नसतानाही लग्न केले आणि एका मुलाचा बाप झाला. राहण्यासाठी फक्त एका खोलीचे घर होते. एक वेळ अशी आली की रडणाऱ्या मुलासाठी दूध आणण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. पण नंतर तो व्यक्ती या सर्व अडचणींवर मात करून तब्बल 800 कोटींचा मालक झाला आहे. प्रसिद्ध गुंतवणूकदार विजय केडिया यांची प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे.
विजय केडिया यांचा जन्म कोलकाता येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडील स्टॉक ब्रोकर होते. पण ते दहावीत असताना वडिलांचे निधन झाले. केडिया यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. परिणामी परीक्षा नीट न दिल्यामुळे ते दहावीत नापास झाले. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाचा खर्च चालवण्याचे कोणतेही साधन उरले नाही. आईच्या सांगण्यावरून त्यांनी कसेतरी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आणि व्यवसाय करण्याचा विचार केला. पण अयशस्वी ठरले. यानंतर शेअर बाजारात व्यवहार सुरू झाले. यातून मिळणाऱ्या कमाईतून घरखर्च चालत नव्हता. दरम्यान, त्यांचे लग्नही झाले. लवकरच ते एका मुलाचा बापही झाले.
मुलाच्या दुधासाठीही नव्हते पैसे
सुरुवातीला व्यापारातून काही पैसे मिळाले पण नंतर त्याचे मोठे नुकसान झाले. एकदा तर आईचे दागिने विकण्याची ही वेळ आली. सर्व ठीक होतंय असं वाटत असतानाच मोठं नुकसान व्हायचं. एके दिवशी असं घडलं की विजय केडिया यांच्याकडे मुलासाठी दूध आणायलाही पैसे नव्हते. दूधाची किंमत त्यावेळी फक्त 14 रुपये होती. पण केडिया यांच्याकडे 14 रुपयेही नव्हते. शेवटी बायकोने इकडे तिकडे घरात ठेवलेली नाणी गोळा करून 14 रुपये जमवले.
मुंबईने साथ दिली
1990 च्या दशकाच्या सुरुवातीला विजय केडिया यांनी कोलकाता सोडले आणि मुंबईला आपले घर बनवले. नशिबाने त्यांना मुंबईने साथ दिली. लवकरच 1992 ची प्रसिद्ध बुल रन आली. अनेक गुंतवणूकदारांनी यामध्ये भरपूर पैसा कमावला. त्यापैकी विजय केडिया हे देखील एक होते. त्यांनी कोलकाता येथून पंजाब ट्रॅक्टर्सचे शेअर्स आणले होते, ज्याची किंमत 35,000 रुपये होती. त्याच्या किमती पाच पटीने वाढल्या. ते विकून ACC चे शेअर्स विकत घेतले. वर्षभरात त्याच्या किमती 10 पट वाढल्या. हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे यश होते. त्यानंतर त्यांनी मुंबईत घर घेतले आणि कुटुंबाला कोलकाताहून मुंबईत आणले.
दूध कंपनी विकत घेऊन पत्नीला दिली भेट
केडिया यांनी काही शेअर्स विकून तीन कंपन्यांचे शेअर्स विकत घेतले. या तिघांचा साठा 10 वर्षांत 100 पटीने वाढला. आता त्यांची गणना यशस्वी गुंतवणूकदारांमध्ये केली जात आहे. 2009 मध्ये त्यांनी एक दूध कंपनी विकत घेतली आणि पत्नीला भेट दिली. त्यांनी पत्नीला सांगितले की ही भेट त्या दिवसाची आहे जेव्हा मी दुधाचे 14 रुपयेही देऊ शकत नव्हते. विजय केडिया आज सुमारे 800 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"