नगरमध्ये पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला - रिव्हॉल्वर पळविले : पोलिसांवर दगडफेक
By admin | Updated: July 11, 2015 00:15 IST
अहमदनगर : नगर महाविद्यालयातील मारहाण प्रकरणातील आरोपी किरण कदम यास पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीसह त्याच्या साथीदारांनी तुफान दगडफेक करत पोलीस उपनिरीक्षक राजेश हिंगोले यांचे रिव्हॉल्वर पळविले़
नगरमध्ये पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला - रिव्हॉल्वर पळविले : पोलिसांवर दगडफेक
अहमदनगर : नगर महाविद्यालयातील मारहाण प्रकरणातील आरोपी किरण कदम यास पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीसह त्याच्या साथीदारांनी तुफान दगडफेक करत पोलीस उपनिरीक्षक राजेश हिंगोले यांचे रिव्हॉल्वर पळविले़पोलिसांशी झालेल्या झटापटीनंतर पळालेल्या कदम यास जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. दगडफेकीत हिंगोले जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़नगर महाविद्यालयात तीन दिवसांपूर्वी दोन गटांत जबर मारहाण झाली होती़ तेव्हापासून पोलीस कदम याच्या मागावर होते़ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजयकुमार सोनी व राजेश हिंगोले यांच्या पथकाने केडगावमधील रेणुकामाता मंदिर परिसरात सापळा रचून कदम यास पकडले. त्यास नेत असतानाच अज्ञात व्यक्तींनी अंधाराचा गैरफायदा घेऊन पोलिसांवर तुफान दगडफेक केली़ त्याचवेळी कदम पोलिसांच्या तावडीतून निसटला़ तेवढ्यात आरोपीच्या साथीदाराने हिंगोले यांचे रिव्हॉल्वर हिसकावून पळ काढला़ त्याच्याशी झालेल्या झटापटीत हिंगोले यांच्या डोक्याला मार लागला़ (प्रतिनिधी)