महागाईचा दर नियंत्रणात ठेवणार

By Admin | Updated: August 16, 2016 01:04 IST2016-08-16T01:04:30+5:302016-08-16T01:04:30+5:30

गरिबांच्या ताटातील जेवण महाग होणे आपल्याला चालणार नसून महागाईचा दर सहा टक्क्यांवर जाऊ दिला जाणार नाही; पोलिसांपेक्षाही अधिक प्रमाणात भीती असलेल्या

Inflation will be kept in control | महागाईचा दर नियंत्रणात ठेवणार

महागाईचा दर नियंत्रणात ठेवणार

नवी दिल्ली : गरिबांच्या ताटातील जेवण महाग होणे आपल्याला चालणार नसून महागाईचा दर सहा टक्क्यांवर जाऊ दिला जाणार नाही; पोलिसांपेक्षाही अधिक प्रमाणात भीती असलेल्या प्राप्तिकर अधिकाऱ्यांचा कर दहशतवाद संपवण्यास प्राधान्य देऊ, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिली.
सोमवारी नवी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी आपले सरकार हे संवेदनशील, जबाबदार, विश्वासार्ह, पारदर्श तसेच परिणामकारक असून स्वराज्य ते सुराज्य दरम्यानचा प्रवास ते नक्कीच पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला.
केवळ लोकप्रिय घोषणा करणे हे सरकारचे काम असल्याच्या परंपरेपासून मला दूर राहणेच अधिक पसंत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सुधारणा, सादरीकरण आणि परिवर्तन ही त्रिसूत्री त्यांनी या वेळी विशद केली.
रुग्णालयांमधील प्रवेशासाठी आॅनलाइन नोंदणी, त्वरित प्राप्तिकर परतावा, जलद कंपनी नोंदणीकरण, गतिशील पारपत्र विवरण आदी निर्णयांचा उल्लेख त्यांनी या वेळी केला. ग्रामीण भागातील रस्ते रुंदीकरण तसेच ऊर्जानिर्मितीतील वाढीची प्रगतीही त्यांनी या वेळी मांडली.
कर दहशतवाद संपविणार
करदात्यांमध्ये निर्माण झालेली व्यवस्थेविषयीची भीती नाहीशी करून छुपा कर दहशतवाद नाहीसा केला जाईल, अशी ग्वाही पंतप्रधानांनी या वेळी दिली. पोलिसांपेक्षाही अधिक त्रास मध्यम तसेच उच्च मध्यमवर्गीयांना प्राप्तिकर अधिकाऱ्यांमार्फत होतो, असे नमूद करत याबाबत आपण स्वत: लक्ष घालत असून लवकरच हे चित्रही बदलेल, असे ते म्हणाले.
देशाच्या अर्थव्यवस्थेला वस्तू व
सेवा कर अंमलबजावणीमुळे
अधिक बळ मिळेल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
(वृत्तसंस्था)

महागाई वाढू देणार नाही
काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा नामोल्लेख टाळत यापूर्वी दोन अंकी आकड्यांत असणारी महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आपल्या सरकारने खूप प्रयत्न केल्याचे नमूद करत मोदी यांनी महागाईचा दर सहा टक्क्यांवर जाऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही या वेळी दिली. गरिबांचे जेवण महाग होणे आपल्याला चालणार नाही, असेही ते म्हणाले. भाज्यांच्या वाढलेल्या किमतीला यापूर्वीच्या मान्सूनची कमतरता जबाबदार असून चिंताजनक बनलेल्या डाळींच्या वाढत्या किमतीवर यंदा लागवड क्षेत्र वाढविण्याचा उतारा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Inflation will be kept in control