नवी दिल्ली : लडाखमध्ये चिनी घुसखोरांनी डोके वर काढले असतानाच हिंदी महासागरातही चीनने युद्धनौका आणि पाणबुड्यांची तैनाती केली आहे़ भारतीय नौदल हिंदी महासागर क्षेत्रातील (आयओआर) चीनच्या या कुरापतींवर बारीक लक्ष ठेवून आहे़नौदलप्रमुख अॅडमिरल रॉबिन धवन यांनी आज गुरुवारी ही माहिती दिली़ हिंदी महासागर क्षेत्रात चिनी युद्धनौका तैनात करण्यात आल्या आहेत़ आम्ही त्यांच्यावर करडी नजर ठेवून आहोत़ युद्धनौकांच्या तैनातींचा अर्थ काय, याचा शोध आम्ही घेत आहोत, असे त्यांनी सांगितले़ आयओआर भारताचे संचालन क्षेत्र आहे़ या क्षेत्रात चिनी युद्धनौका तैनात केल्या गेल्या असतील तर त्याचा अर्थ काय? त्यांच्यापासून कुठलीही आव्हाने आपल्यासमोर उभी ठाकू शकतात आणि आपण त्याचा कसा सामना केला जाऊ शकतो, याबाबत नौदल सजग आहे़ कुठल्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी भारताची विमाने, पाणबुड्या आणि युद्धनौका सज्ज आहेत, असेही ते म्हणाले़चुमार क्षेत्रात गत दोन आठवड्यांपासून चिनी घुसखोरांच्या कारवाया सुरू आहेत़ यामुळे भारत-चीन सीमेवर तणाव वाढला आहे़ या पार्श्वभूमीवर नौदलप्रमुखांना छेडले असता, त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला़ यावर्षी चीन आणि भारत यांच्यातील प्रस्तावित सागरी चर्चेबाबत विचारले असता ते म्हणाले की, बंदरांचा दौरा आणि सागरी चाच्यांविरोधी मोहिमेत उभय देश सहकार्य करीत आले आहेत़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
हिंदी महासागरात भारतीय नौदलाची करडी नजर
By admin | Updated: September 26, 2014 05:03 IST