ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - भारतीय मुसलमान हे देशभक्त असून त्यांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करता येणार नाही. भारतीय मुसलमान हे देशासाठीच जगतील व देशासाठीच बलिदान देतील. ते अन्य कोणाच्या इशा-यावर नाचणार नाहीत असे सडेतोड प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल कायदाला दिले आहे.
नरेंद्र मोदी यांनी एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीला मुलाखत दिली असून या मुलाखातीमध्ये त्यांना अल कायदाच्या व्हिडीओ विषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर मोदी म्हणाले, ते (अल कायदा) भारतीय मुसलमानांवर अन्याय करत आहे. भारतीय मुसलमान त्यांच्या इशा-यावर नाचतील असे त्यांना वाटत असेल तर हा त्यांचा भ्रम आहे. भारतीय मुसलमान देशासाठी बलिदान देतील पण विश्वासघात करणार नाही.अल कायदा मानवताविरोधी संघटना असून या विरोधात लढण्यासाठी मानवतावादी विचारांनी एकत्र येऊन लढण्याची गरज असल्याचे मतही मोदींनी व्यक्त केले.
अल कायदाचे प्रमुख अल जवाहिरी यांनी नुकताच एक व्हिडीओ जाहीर केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी मुसलमानांवरील अन्याय रोखण्यासाठी भारतात अल कायदाची शाखा सुरु करण्याचे विधान केले होते. या मुलाखातीमध्ये मोदींनी अमेरिका आणि भारतातील संबंध सुधारतील असा विश्वासही व्यक्त केला आहे.