ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. २६ - राजस्थानमध्ये २६ जानेवारी रोजी बाँबस्फोट घडवण्याची धमकी राज्याच्या १६ मंत्र्यांच्या अधिकृत ई-मेलवर इंडियन मुजाहिदीनने दिल्याचे वृत्त आहे. राजस्थान सरकारने या वृत्तास दुजोरा दिला असून हा मेल कोणी पाठवला, ही खरीच धमकी आहे का कुणाची चेष्टा आहे आदी बाबींचा तपास करण्यात येत आहे. इंडियन मुजाहिदीन ही बंदी घातलेली व दहशतवादी घोषित केलेली संघटना असून पाकिस्तानच्या लष्कर ए तय्यब्बा या दहशतवादी संघटनेच्या इशा-यावर भारतात घातपाती कारवाया करते असे आढळले आहे. भारतात झालेल्या अनेक दहशवादी घटनांमध्ये मुजाहिदीनचा हात असल्याचे आढळले असल्याने या ई-मेलचा गंभीरपणे माग घेण्यात येत आहे.
अर्थात, राजस्थानमध्ये पोलीस व सुरक्षा यंत्रणा अत्यंत सतर्क असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. भारतामध्ये इस्लामिक राजवट आणून शरीया कायदा लागू करण्याची इंडियन मुजाहिदीनची महत्त्वाकांक्षा असल्याचे सांगण्यात येते.