ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. ५ - सीमा रेषेवर पाक सैन्याकडून पुन्हा गोळीबार सुरु झाला असून सोमवारी दुपारी पाक सैन्याच्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला आहे. गेल्या आठवडाभरात पाकच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद झाल्याची ही चौथी घटना आहे.
सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास कठुआ आणि सांबा सेक्टरमध्ये पाक रेंजर्सनी बीएसएफच्या २० चौक्यांवर अंधाधूंद गोळीबार केला. या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान शहीद झाला आहे. पाक सैन्याने रविवारी रात्रीपासूनच कठुआ सेक्टरमधील बोबियान आणि पनसर भागात गोळीबार सुरु केल्याचे बीएसएफचे उपायुक्त शाहिद इक्बाल यांनी सांगतले. सीमेवरील तणावपूर्ण वातावरणामुळे सीमा रेषेजवळील गावांमध्ये राहणा-या सुमारे साडे तीन हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.