अमेरिका भारताविरोधात कायम दुटप्पी धोरण राबवत आलेली आहे. एकीकडे पाकिस्तानला भारताविरोधात युद्धासाठी शस्त्रास्त्रे पुरवायची आणि भारत आपला परंपरागत मित्र देश रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत आहे, त्याला विरोध करायचा, का तर रशियाने युक्रेनविरोधात युद्ध सुरु ठेवले आहे म्हणून. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ आणि वर दंड आकारला आहे. आणखी दंड लादण्याची भाषा करत आहेत. अशातच आता ट्रम्प यांच्याविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री झाली आहे.
भारत द्वेष खच्चून भरलेली अमेरिकापाकिस्तानला कशाप्रकारे लष्करी मदत करत होती, यामुळे पाकिस्तान कसे पुन्हा पुन्हा युद्धाची खुमखुमी दाखवत होता, याची वृत्तपत्रांची कात्रणेच भारतीय सैन्याने जाहीर करून टाकली आहेत. आजपासून बरोबर ५४ वर्षांपूर्वी अमेरिका पाकिस्तानच्या साथीने भारताविरोधात काय कारस्थाने रचत होता, याचे पुरावेच सोशल मीडियावर दिले आहेत.
भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडने एक्स अकाऊंटवर ५४ वर्षे जुन्या वृत्ताची कात्रणे पोस्ट केली आहेत. १९५४ ते १९७१ दरम्यान अमेरिकेने पाकिस्तानला २ अब्ज डॉलर्स (१ लाख कोटी रुपये) पेक्षा जास्त किमतीची शस्त्रे पाठवली होती. हे दोन अब्ज डॉलर्स हे त्यावेळचे मुल्य होते. वृत्तपत्रातील कटिंग ५ ऑगस्ट १९७१ ची आहेत. या वृत्ताच्या बाजुलाच पाकिस्तान युद्धाची तयारी करत आहे, असेही वृत्त आहे. मेरिका अनेक दशकांपासून पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पुरवत होती, ज्याच्या आधारे पाकिस्तान भारताविरुद्ध युद्धाची तयारी करत होता. १९६५ आणि १९७१ चे युद्ध हे त्याचेच परिणाम होते, ज्याची बीजे अमेरिकेने दशकांपूर्वी पेरली होती.
तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री व्हीसी शुक्ला यांचे विधान देखील वर्तमानपत्राच्या या पानावर आहे. बांगलादेशातील बंडखोरी लक्षात घेता, नाटो देश आणि सोव्हिएत युनियनला पाकिस्तानला शस्त्रे पुरवण्यास सांगितले होते, असे शुक्ला यांनी राज्यसभेत सांगितले होते. हीच अमेरिका आजही दहशतवादाचा जन्मदाता पाकिस्तानला भारताविरोधात लढण्यासाठी लढाऊ विमाने, शस्त्रास्त्रे पुरवत आहे. वर भारतावरच निर्बंध आणि दंड लादण्यात येत आहेत.