Army Chief Upendra Dwivedi: भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी भविष्यातील सुरक्षा चिंतेवर आपले विचार मांडले आहेत. भविष्यात कोणत्या प्रकारचे धोके निर्माण होतील हे सांगणे अशक्य असल्याचे भारतीय लष्करप्रमुखांनी म्हटलं. जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मध्य प्रदेशातील रीवा शहरात तरुण पिढीशी थेट संवाद साधत, भविष्यातील आव्हानांवर स्पष्ट भाष्य केले. भविष्यात कोणत्या स्वरूपाचे धोके असतील, याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही, असे महत्त्वपूर्ण मत त्यांनी मांडले. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख करत त्यांना टोला लगावला.
टीआरएस कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना जनरल द्विवेदी यांनी सध्याच्या जगाची अस्थिरता, अनिश्चितता, जटिलता आणि अस्पष्टता अशी स्थिती असल्याचे सांगितले. सेनाप्रमुख म्हणाले, "पुढील दिवस कसे असतील, हे ना तुम्हाला माहीत आहे ना मला. उद्या काय होणार आहे, हेही कोणालाच माहिती नाही." यादरम्यान त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे उदाहरण दिले. "ट्रम्प आज काय करत आहेत, मला वाटतं त्यांनाही उद्या काय करायचं आहे, हे माहीत नसेल." यावरून त्यांनी भविष्यातील अनिश्चितता किती मोठी आहे, हे स्पष्ट केले.
जनरल द्विवेदी यांनी लष्करासमोर असलेल्या आव्हानांची मालिकाच सांगितली. ते म्हणाले, "आपण एका संकटातून बाहेर पडतो न पडतो, तोवर दुसरे आव्हान समोर उभे राहते. सीमेवरचे धोके असोत, दहशतवाद असो किंवा मग नैसर्गिक आपत्ती, आता लढाईचे स्वरूप बदलले आहे." लष्करप्रमुख यांनी स्पष्ट केले की, आजची लढाई केवळ प्रत्यक्ष सैनिकांच्या बळावर नाही, तर बुद्धी आणि तंत्रज्ञानाच्या बळावर लढली जाते.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान खोट्या बातम्या पसरवल्या
"याचा अर्थ असा की आम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेची आणि तुमच्या सहभागाची गरज आहे. आमच्या सैन्याने नवीन तंत्रज्ञान, ड्रोन आणि अचूक शस्त्रे स्वीकारली आहेत. बदलत्या वेळेनुसार आम्ही स्वतःला बदलले, म्हणूनच आम्हाला विजय मिळाला. ऑपरेशन सिंदूरमध्ये कराचीवर हल्ला झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्या कुठून आल्या, कोणी सुरू केल्या, हे कळलेच नाही. गोष्टी किती वेगाने आणि किती भ्रामक होऊ शकतात," असेही ते म्हणाले.
फेक न्यूजच्या या धोक्याचा सामना करण्यासाठी सामान्य नागरिक कसे मदत करू शकतात, याचे उदाहरणही त्यांनी दिले. ते म्हणाले की, पाकिस्तान जेव्हा खोट्या बातम्या पसरवत होता, तेव्हा सिकंदराबादचा एक तरुण माझ्याकडे आला आणि म्हणाला, "सर, मी त्यांच्या खोट्या बातम्या उघड पाडेन, मला सांगा मी काय करू?"
जनरल द्विवेदी यांनी तरुण पिढीला, म्हणजेच जनरेशन झेडला भारताचे भविष्य असल्याचे म्हटले. "जेन झेड ही डिजिटल तंत्रज्ञानात हुशार आहे, तांत्रिकदृष्ट्या प्रगत, सामाजिक दृष्ट्या जागरूक आणि जागतिक स्तरावर जोडलेली आहे. त्यांच्याकडे जगभरातील माहितीचा खजिना आहे. जर एवढ्या शक्तिशाली पिढीला शिस्त आणि योग्य मार्गदर्शन मिळाले, तर भारत एका क्षणात अनेक पिढ्या पुढे जाऊ शकतो. येणाऱ्या काळात जनरेशन झेड हेच देशाला पुढे घेऊन जाणारे इंधन ठरेल, असेही लष्करप्रमुख म्हणाले.
Web Summary : Army Chief Dwivedi highlighted future security concerns, including cyber warfare and fake news. He emphasized the crucial role of Gen Z, calling them India's fuel for progress.
Web Summary : सेना प्रमुख द्विवेदी ने साइबर युद्ध और झूठी खबरों सहित भविष्य की सुरक्षा चिंताओं पर प्रकाश डाला। उन्होंने जेन जेड की महत्वपूर्ण भूमिका पर जोर दिया, उन्हें भारत की प्रगति का ईंधन बताया।