नवी दिल्ली : देशातील युवकांसोबतचे आपले नाते घनिष्ठ मित्राप्रमाणे आहे. या युवा शक्तीत भारताला लवकरात लवकर विकसित राष्ट्र बनवण्याची क्षमता असल्याचा दावा रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. काही लोकांना विकसित भारताचे लक्ष्य अवघड वाटू शकते. मात्र, ते अशक्य नसल्याचे प्रतिपादन मोदींनी केले. ‘विकसित भारताच्या युवा नेत्यांशी संवाद’ या कार्यक्रमाला संबोधित करताना मोदी बोलत होते.
देशातील युवा लोकसंख्येची क्षमता देशाला विकसित होण्यासाठी मदत करेल. विकसित भारताची भावना युवकांना धोरण राबविण्यात व निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करणार असेल तर कुठलीही ताकद भारताला विकसित देश होण्यापासून रोखू शकत नाही, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. कोणत्याही देशाला प्रगतीसाठी निर्धारित केलेले महत्त्वाचे ध्येय प्राप्त करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागते. लक्ष्याशिवाय जीवनाला अर्थ नाही. लक्ष्य आपल्याला उद्देश व प्रेरणा देतात. जेव्हा आपण महत्त्वाकांक्षी लक्ष्य निश्चित करतो, तेव्हा ते पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करतो. आज भारत देश याच भावनेला मूर्त स्वरूप देत आहे.