हरीश गुप्ता
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) ४२ सक्रिय दहशतवादी अड्डे असल्याची कागदपत्रे यंत्रणांनी सादर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांशी विचारविनिमय करत आहेत.
पाकव्याप्त काश्मिरात जे दहशतवादी अड्डे आहेत त्यातील १० उत्तरेकडील व ३२ दक्षिणेकडील भागात आहेत. यात प्रत्येक ठिकाणी १०० ते १३० दहशतवादी आहेत. हे अड्डे नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानी लष्करी चौक्यांजवळ आहेत. तेथून ते भारतात घुसखोरी करतात. दहशतवादी नेटवर्क पीओकेच्या पलीकडे पसरलेले आहे. ज्याचे मुख्यालय मुरीदके (लष्कर), बहावलपूर (जैश) आणि मुझफ्फराबाद (हिजबुल) येथे आहे. गुप्तचर संस्थांनी पाच जणांची ओळख पटवली आहे. ज्यांनी अबू मुसा (लश्कर-ए-तोयबा), इद्रिस शाहीन (हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामी), मोहम्मद नवाज (लश्कर-ए-तोयबासाठी भरती करणारा), अब्दुल रफा रसूल (हिजबुल) आणि अब्दुल्ला खालिद (लश्कर-ए-तोयबा) या पाच कमांडरांच्या निर्देशानुसार हल्ला घडवून आणला. तपासकर्त्यांचा असा दावा आहे की, या हल्ल्याला पाकिस्तानच्या लष्कराने व आयएसआयने पाठिंबा दिला होता.
कोणतीही कारवाई करण्यास लष्कर सज्ज
कोणतीही कारवाई करण्यास लष्कर सज्ज आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितल्याचे कळते. त्यांनी सोमवारी पंतप्रधानांची भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली. काश्मीरमधील स्थितीबाबत त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली.
या हल्ल्यामागील सूत्रधारांना शिक्षा करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पर्यायांचा या बैठकीत विचार करण्यात आल्याचे समजते. त्या बैठकीबाबत केंद्र सरकारने अद्याप अधिकृतरीत्या कोणतीही माहिती दिलेली नाही.
भारतीय हवाई दलाला दोन मिनिटांच्या आत सज्ज होण्याचे केंद्राचे आदेश
सुरेश एस. डुग्गर
जम्मू : पाकिस्तानी लष्कराने सीमेवर हालचाली वाढवल्याने, भारतीय हवाई दलाला आदेश येताच दोन मिनिटांच्या आत कारवाईसाठी सज्ज होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारत व पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करी सज्जतेच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर अधिक संख्येने तोफा आणण्यात आल्या आहेत.
आणखी दहशतवादी घुसविण्याचा पाकचा कट
पुंछ आणि काश्मीरच्या इतर भागांत पाकिस्तानकडून गोळीबार अद्याप सुरूच आहे. पाकिस्तानने आपल्या सीमावर्ती गावांमधील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे.
गेल्या ४ दिवसांत पाककडून सतत शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन होत आहेत. काश्मीरमध्ये दहशतवादी घुसविण्यासाठी या हालचाली सुरू आहेत असे सूत्रांनी म्हटले आहे.