भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आता खूप वाढला आहे. काल रात्री हरियाणातील सिरसा जिल्ह्यात एक पाकिस्तानी क्षेपणास्त्रही पाडण्यात आले. त्याचे तुकडे आता एका शेतात सापडले आहेत. संरक्षण सूत्रांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानने काल रात्री दिल्लीला लक्ष्य करण्यासाठी फतेह-२ क्षेपणास्त्र डागले होते, जे भारतीय सैन्याने सिरसा येथे पाडले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सिरसा येथील रानियाजवळ घडली. या ठिकाणी रात्री १२.३०च्या सुमारास प्रकाश दिसला आणि नंतर मोठा स्फोट ऐकू आला. स्फोटानंतर, एका घराच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रकाशामुळे रात्र दिवसासारखी दिसत होती. दुसरीकडे, शनिवारी सकाळी रानिया रोडवरील खाजा खेडा गावातील शेतात पाकिस्तानी क्षेपणास्त्राचे तुकडे पडलेले आढळले, जे लष्कराच्या जवानांनी जप्त केले आहेत.
नेमकं काय झालं?अचानक प्रकाश पडला आणि अचानक तीन स्फोट झाले. मग शहराची वीज खंडित करण्यात आली आणि सर्वांचे दिवे बंद करण्यात आले. सिरसा येथील क्षेपणास्त्र हल्ल्याच्या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी ही कहाणी सांगितली आहे.
एका कार्यक्रमातून घरी परतणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, "आमच्या गाडीत चार लोक होते आणि आम्ही उड्डाणपुलाजवळ गाडी थांबवली. यावेळी आकाशात प्रकाश दिसला आणि नंतर स्फोट झाला. त्यावेळी,जवळपास १०-१५ लोक उभे होते,ते सर्व पळून गेले. पण, आम्हाला आवाज काय होता हे समजले नाही आणि आम्ही गाडीचे दिवे बंद केले. मग २ मिनिटांनी शहराची वीज खंडित झाली."
दुसऱ्या एका व्यक्तीने सांगितले की,"यानंतर पोलीसही आमच्याकडे आले आणि आमची चौकशी केली. आम्ही पोलिसांना घडलेला प्रकार कळवला. स्फोट कुठे झाला हे आम्हाला कळले नाही."