नवी दिल्ली - जम्मू काश्मीर इथल्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा जीव गेला. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. केंद्र सरकारनेही आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानविरोधात मोठे निर्णय घेतले. तेव्हापासून भारत-पाकिस्तान यांच्यात तणावाची परिस्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताच्या तिन्ही सैन्य दलाने सरावाला सुरुवात केली आहे. त्यात भारतीय हवाई दल उत्तर प्रदेशातील गंगा एक्सप्रेस हायवेवर ऐतिहासिक ताकद दाखवणार आहे.
बांधकाम सुरू असणाऱ्या गंगा एक्सप्रेसवरील शाहजहांपूर येथे बनलेल्या साडे तीन किमी रस्त्यावर हवाई दलाचे लढाऊ विमान एअर शो करून शत्रूला ताकद दाखवतील. या मिशनमध्ये वायूसेनेचे सर्वात एडवान्स फायटर टेकऑफ आणि लँडिंग करतील. या एअर शो मध्ये जगुआर आणि मिराजसारखे लढाऊ विमानेही सहभागी होणार आहेत. आपत्कालीन स्थितीत एक्सप्रेस हायवेला रनवे बनवण्याचा पर्याय म्हणून या एअर शो कडे पाहिले जाते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २७ एप्रिलला शाहजहांपूर येथे गंगा एक्सप्रेसवर बनलेल्या रनवेचं निरीक्षण केले.
विशेष म्हणजे हा देशातील पहिला हायवे रनवे असेल जिथे वायूसेनेची लढाऊ विमाने रात्रंदिवस उड्डाण आणि लँडिंग करू शकतील. फायटर प्लेनही इथं सराव करतील. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या रनवेवर जवळपास २५० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याशिवाय १ हजाराहून अधिक पोलीस कर्मचारी इथं सुरक्षा सांभाळत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी ६ पथके तैनात आहेत. मिनी ब्लड बँकपासून अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
शाहजहांपूरमधील गंगा एक्सप्रेसवर पीरू गावाजवळ साडे ३ किमी लांब हवाई पट्टी बनवण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ही हवाई पट्टी खूप महत्त्वपूर्ण आहे कारण चीन सीमेपासून २५० किमी अंतरावर रनवे आहे. आजच्या प्रात्यक्षिकांमध्ये फायटर जेट टच अँन्ड गोचा सराव करतील. त्याशिवाय इंधन भरण्याचाही सराव घेतला जाईल. नाईट लँडिंगची विशेष व्यवस्था उभारण्यात आली आहे. युद्ध विमान लँडिंग शो पाहण्यासाठी शाळकरी मुलेही पोहचणार आहेत. २ आणि ३ मे रोजी भारतीय हवाई दल या रनवेवर सराव करेल. त्यात अनेकप्रकारचे ड्रिलही असतील.