एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही मागे टाकेल असा एक रंजक आणि तितकाच खळबळजनक प्रकार तेलंगणा हायकोर्टात पाहायला मिळाला. हैदराबादच्या याकूतपुरा भागात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय तरुणाच्या नागरिकत्वावरून सुरू असलेल्या वादात आता एक मोठे वळण आले आहे. ज्या तरुणाने आतापर्यंत "माझ्याकडे भारतीय पासपोर्टच नाही" असा दावा केला होता, त्याने अचानक कोर्टात भारतीय पासपोर्ट सादर केल्याने न्यायाधीशांनीही आश्चर्य आणि चिंता व्यक्त केली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
नेमकं प्रकरण काय?
हैदराबादमधील याकूतपुरा येथील रहिवासी असलेल्या या तरुणावर पोलीस आणि प्रशासनाकडून कारवाई सुरू होती. पोलिसांच्या दाव्यानुसार, या तरुणाचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला आहे, त्यामुळे त्याला भारतात राहण्यासाठी 'लॉन्ग टर्म व्हिसा' घेणे अनिवार्य आहे. मात्र, या कारवाईला तरुणाने हायकोर्टात आव्हान दिले होते. सिंगल बेंचने पोलिसांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर त्याने डिव्हिजन बेंचकडे धाव घेतली होती.
कोर्टात असा फुटला खोटेपणाचा घडा
या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना तरुणाने आपण हैदराबादमध्येच जन्मलो असल्याचा दावा केला. विशेष म्हणजे, जुलै २०२५ मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्याने स्पष्टपणे नमूद केले होते की, त्याच्याकडे कोणताही भारतीय पासपोर्ट नाही आणि त्याने कधी त्यासाठी अर्जही केला नाही. मात्र, अचानक त्याने कोर्टात २०२२ मध्ये जारी झालेला एक भारतीय पासपोर्ट सादर केला.
हे पाहून हायकोर्टाचे खंडपीठ चकित झाले. "जर तुमच्याकडे पासपोर्ट होता, तर पोलीस घरी आले तेव्हा का दाखवला नाही? आणि प्रतिज्ञापत्रात खोटं का लिहिलं?" असा संतप्त सवाल कोर्टाने उपस्थित केला.
पोलिसांचा दावा आणि कौटुंबिक पार्श्वभूमी
पोलिसांनी कोर्टात या तरुणाचा संपूर्ण इतिहासच मांडला. पोलिसांच्या माहितीनुसार, या तरुणाची आई हैदराबादची मूळ रहिवासी होती, मात्र तिचे लग्न एका पाकिस्तानी नागरिकाशी झाले होते. लग्नानंतर ती पाकिस्तानला गेली आणि तिथेच या तरुणाचा जन्म झाला. आईच्या पाकिस्तानी पासपोर्टवर मुलाचे नाव नोंदवण्यात आले होते. घरगुती वादामुळे त्याची आई त्याला लहानपणीच भारतात घेऊन आली होती. याच तांत्रिक कारणास्तव पोलीस त्याला पाकिस्तानी नागरिक मानत होते आणि त्याला कायदेशीर व्हिसा घेण्यास सांगत होते.
प्रकरणाचा शेवट
सुरुवातीला कोर्टाला असे वाटले की, पोलीस कदाचित एखाद्या निष्पाप व्यक्तीला त्रास देत आहेत. पण जसा तपास पुढे सरकला आणि पासपोर्टमधील नावांमध्ये असलेली तफावत समोर आली, तशी कोर्टाने या प्रकरणावर गंभीर चिंता व्यक्त केली. खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याने तरुणाची बाजू कमकुवत झाली. अखेर, आपली डाळ शिजणार नाही हे लक्षात आल्यावर तरुणाने आपली याचिका मागे घेतली. आता याप्रकरणी पोलीस कायद्यानुसार पुढील कठोर कारवाई करण्यास मोकळे आहेत.
Web Summary : A Hyderabad man, initially denying an Indian passport, presented one in court, shocking judges. Accused of Pakistani origin, he faces legal action for false claims. The court questioned his contradictory statements, weakening his case.
Web Summary : हैदराबाद के एक व्यक्ति, जिसने पहले पासपोर्ट से इनकार किया, ने कोर्ट में पेश किया। पाकिस्तानी मूल के आरोप में, झूठे दावों के लिए कानूनी कार्रवाई का सामना कर रहा है। कोर्ट ने विरोधाभासी बयानों पर सवाल उठाया।