India on Trade Deal with USA: अमेरिकेकडून भारतावर लादण्यात आलेल्या टॅरिफच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रंधीर जायसवाल यांनी मोठी माहिती दिले आहे. त्यांनी सांगितले की भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार कराराबाबतची चर्चा पुढे सरकत आहे. याशिवाय, सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या करारावरही त्यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली.
भारत-अमेरिका व्यापार चर्चा
जायसवाल यांनी सांगितले की, 16 सप्टेंबर 2025 रोजी सहाय्यक अमेरिकन व्यापार प्रतिनिधी ब्रेंडन लिंच यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकन प्रतिनिधीमंडळाने वाणिज्य मंत्रालयात बैठक घेतली. ही चर्चा सकारात्मक आणि दूरदृष्टी ठेवून झाली असून व्यापार कराराच्या अनेक मुद्द्यांवर विचारविनिमय झाला. दोन्ही बाजूंनी शक्य तितक्या लवकर परस्पर हिताचा करार करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले.
सौदी-पाकिस्तान करारावर भारताची भूमिका
सौदी अरेबिया आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या करारावर विचारले असता, जायसवाल म्हणाले, भारत आणि सौदी अरेबियामध्ये व्यापक धोरणात्मक भागीदारी आहे आणि ती गेल्या काही वर्षांत अधिक बळकट झाली आहे. या भागीदारीत दोन्ही देशांच्या हितसंबंधांचा आणि संवेदनशील मुद्द्यांचा विचार केला जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
व्यापार चर्चेत प्रगती - पीयूष गोयल
यापूर्वी वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी 17 सप्टेंबर 2025 रोजी सांगितले होते की, भारत-अमेरिका व्यापार चर्चा प्रगतीपथावर आहे आणि योग्य दिशेने वाटचाल करत आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत सुमारे सात तास चाललेल्या बैठकीनंतर वाणिज्य मंत्रालयाने म्हटले की, परस्पर हिताचा व्यापार करार शक्य तितक्या लवकर अंतिम करण्यासाठी प्रयत्न गतीमान करण्याचे ठरले आहे.