नवी दिल्ली : भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ३१ व्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह समस्त देशवासीयांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हामिद अन्सारी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह अनेक नेत्यांनी दिवंगत इंदिराजींचे समाधी स्थळ असलेल्या शक्तिस्थळावर जाऊन त्यांना पुष्पांजली अर्पण केली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, मोतीलाल व्होरा, अहमद पटेल, अशोक गहलोत यांचाही यात समावेश होता. यावेळी शक्तिस्थळावर देशभक्तिपर गीत आणि इंदिरा गांधींचे एक भाषणही ऐकविण्यात आले. ३१ आॅक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधी यांची त्यांच्या अंगरक्षकांनीच हत्या केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवर इंदिरा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. तत्पूर्वी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय एकता दिन कार्यक्रमात मार्गदर्शन करतानाही मोदी यांनी माजी पंतप्रधानांचे स्मरण केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
इंदिरा गांधी यांना देशाची आदरांजली
By admin | Updated: November 1, 2015 00:28 IST