H125 Helicopters: भारत आणि फ्रान्स यांच्यातील सहकार्याची व्याप्ती मंगळवारी एका ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी कर्नाटकच्या वेमगल येथे एअरबस H125 हेलिकॉप्टरच्या असेंब्ली लाईनचे व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन केले. मेक इन इंडिया अंतर्गत सुरू झालेला हा प्रकल्प भारताच्या संरक्षण आणि नागरी विमान वाहतूक क्षेत्रात क्रांती घडवणारा ठरणार आहे.
"एव्हरेस्टच्या उंचीवर झेपावणारे हेलिकॉप्टर आता भारतात"
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "भारत आणि फ्रान्स आता मिळून अशा हेलिकॉप्टरची निर्मिती करतील जे माउंट एव्हरेस्टच्या उंचीवरही सहज उडू शकेल." हे हेलिकॉप्टर भारताच्या अतिउंच हिमालयीन सीमा आणि दुर्गम भागातील सुरक्षेसाठी गेम चेंजर ठरणार आहे.
टाटा आणि एअरबसची मोठी भागीदारी
हा प्रकल्प टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड आणि एअरबस यांचा संयुक्त उपक्रम आहे. महत्त्वाचे म्हणजे, खासगी क्षेत्रात हेलिकॉप्टर निर्मितीचा हा देशातील पहिलाच कारखाना आहे. गुजरातच्या वडोदरा येथील C295 मालवाहू विमानांच्या प्रकल्पानंतर टाटा-एअरबसची ही दुसरी मोठी भागीदारी आहे.
H125 हेलिकॉप्टरची खास वैशिष्ट्ये
एच १२५ हे जगातील एकमेव हेलिकॉप्टर आहे ज्याने माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर यशस्वी लँडिंग करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. हे हेलिकॉप्टर ताशी २५० किमी वेगाने उडू शकते आणि एका प्रवासात ६६२ किमी (बंगळुरू ते हैदराबाद इतके) अंतर कापू शकते. राजस्थानची कडक उष्णता असो वा हिमालयातील गोठवणारी थंडी, हे हेलिकॉप्टर कोणत्याही परिस्थितीत काम करण्यास सक्षम आहे. शोध आणि बचाव कार्य, एअर अॅम्ब्युलन्स, कायदा आणि सुव्यवस्था, अग्निशमन आणि पर्यटनासाठी याचा वापर केला जातो.
लष्करी सामर्थ्य वाढणार
वेमगल येथील कारखान्यात नागरी हेलिकॉप्टरसोबतच लष्करी उपयोगासाठी एच १२५ एमची निर्मितीही केली जाईल. हे हेलिकॉप्टर शत्रूच्या रडारपासून वाचण्यासाठी जमिनीला लागून उडू शकते. यात क्षेपणास्त्रे, रॉकेट आणि गनपॉड बसवण्याची सोय असून, हिमालयातील थंडीत तैनात असलेल्या जवानांसाठी हे वरदान ठरेल.
दरम्यान, या प्रकल्पामुळे हजारो कुशल नोकऱ्या निर्माण होतील आणि स्थानिक पुरवठादारांना मोठे काम मिळेल. सुरुवातीला दरवर्षी १० हेलिकॉप्टर तयार केली जातील. पुढील २० वर्षांत ५०० हेलिकॉप्टरची मागणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या कारखान्यातून पहिले मेड इन इंडिया हेलिकॉप्टर २०२७ च्या सुरुवातीला बाहेर पडण्याची अपेक्षा आहे.
Web Summary : India and France partner to produce H125 helicopters, capable of Everest altitudes, in India. The Tata-Airbus venture will boost defense, create jobs, and produce 10 helicopters annually, starting in 2027. This will enhance security in remote regions.
Web Summary : भारत और फ्रांस मिलकर भारत में एवरेस्ट की ऊंचाई तक उड़ने में सक्षम H125 हेलीकॉप्टर का निर्माण करेंगे। टाटा-एयरबस उद्यम रक्षा को बढ़ावा देगा, रोजगार पैदा करेगा और 2027 से सालाना 10 हेलीकॉप्टर का उत्पादन करेगा। इससे दूरदराज के क्षेत्रों में सुरक्षा बढ़ेगी।