लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंंतर भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाई करत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर भारतालाही ४८ तासांत शरणागती पत्करण्यास प्रवृत्त करू, अशी वल्गना पाकने केली होती. मात्र, भारतीय लष्कराच्या उत्तराने पाकची कारवाई अवघ्या आठ तासांतच संपविली, अशी स्पष्टोक्ती चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘संरक्षण आणि सामरिक अभ्यास विभागा’तर्फे ‘भविष्यातील युद्ध आणि युद्धतंत्र’ या विषयावर चौहान यांचे व्याख्यान आयोजित केले होते. ते म्हणाले, भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी अनेक प्रकारच्या संरक्षण क्षमता आत्मसात केल्या आहेत. युद्धभूमीत क्षमतेची चाचणी घेतली जाते. येथे नेहमीच धोका असतो पण तुम्ही धोका पत्करत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नसून केवळ तात्पुरता शांतता करार झाला आहे. यासाठी सजग राहण्याची गरज आहे. पाकने भारताला दहशतवादी कारवायांद्वारे वेठीस धरू नये. भारत आता दहशतवाद व अणुबॉम्बच्या दहशतीखाली जगणार नाही, असेही चौहान यांनी स्पष्ट केले.