नवी दिल्ली : पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या अशोभनीय वक्तव्यावर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत त्यांना फटकारले आहे. भुट्टो यांनी न्यूयॉर्कमध्ये पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असभ्य भाषेत टीका केली होती.
बिलावल यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना त्यांना पंतप्रधान होईपर्यंत अमेरिकेत येण्यास बंदी होती. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परराष्ट्रमंत्री आहेत, अशी टीका केली होती. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला फटकारल्यानंतर बिलावल भुट्टो यांचा तिळपापड झाला. त्यातून त्यांनी ही टीका केली.
‘पाकिस्तान म्हणजे दहशतवादाचा केंद्रबिंदू’ जग पाककडे ‘दहशतवादाचा केंद्रबिंदू’ म्हणून पाहते. त्याने चांगला शेजारी बनण्याचा प्रयत्न करावा, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले. ‘जे लोक आपल्या परसात साप पाळतात, त्यांनाच ते चावतात,’ या क्लिंटन यांच्या सल्ल्याचीही जयशंकर यांनी आठवण करून दिली.
पाकची पातळी दिसलीnबिलावल यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भारताने तीव्र आक्षेप नोंदविला. भारताने त्यांच्या वक्तव्याला ‘असंस्कृत’ म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, या टिप्पण्यांमधून पाकिस्तानची पातळी किती आहे, ते भारताविरुद्ध विष ओकण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतात, हे दिसून येते. nबिलावल भुट्टो १९७१ साल विसरले आहेत; जेव्हा पाकिस्तान सरकारने बंगाली आणि हिंदूंची कत्तल केली होती; दुर्दैवाने आजपर्यंत पाकिस्तानच्या अल्पसंख्याकांबद्दलच्या दृष्टिकोनात फारसा बदल झालेला नाही आणि ते भारतावर आरोप करीत आहेत.