भारत आणि चीन यांच्यातील कोर कमांडर स्तरावरील २३ वी महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी पार पडली. दोन्ही देशांतील सीमा वादाचे काही राहिलेले मुद्दे सोडवण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडली. तसेच, दोन्ही देशांनी सीमावर्ती भागांत शांतता आणि स्थिरता राखण्यावर जोर दिला.
या बैठकीत पूर्व लडाखसह वाद असलेल्या काही भागांच्या मुद्द्यांवरही सविस्तर चर्चा झाली. दरम्यान, दोन्ही देशांनी परस्पर विश्वास वाढवण्यावर आणि सीमा व्यवस्थापन मजबूत करण्यावर सहमती दर्शवली आहे. या बैठकीमुळे दोन्ही देशांचे संबंध सुधारण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले असल्याचे मानले जात आहे. महत्वाचे म्हणजे, २०२० नंतर याच आठवड्यात भारत आणि चीनदरम्यानची थेट विमानसेवाही पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
तणाव कमी करण्यात यश -२०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर भारत-चीन संबंध कमालीचे ताणले गेले होते. मात्र, गेल्या एका वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या दोन भेटींमुळे तणाव कमी होण्यास मदत झाली. याच बरोबर, सीमा विवादाच्या कायमस्वरूपी समाधानासाठी विशेष प्रतिनिधी स्तरावरील चर्चाही पुन्हा सुरू झाली आहे.
दरम्यान, चीनने भारतीय यात्रेकरूंना मानसरोवर यात्रेची परवानगी दिली आहे, तर भारतानेही चिनी नागरिकांना व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, वास्तविक नियंत्रण रेषे (LAC) जवळील काही भागांमध्ये सैन्य तैनातीसंदर्भात अजूनही काही मतभेद आहेत. लष्करी कमांडर स्तरावरील ही बैठक जवळपास एक वर्षानंतर पार पडली आहे.
दोन्ही देशांचे सार्वभौमत्व आणि सुरक्षा हीत, यांचा विचार करूनच सीमा वादावर तोडगा काढला जाईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वीच अनेक वेळा स्पष्ट केले आहे.