शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

चंद्रावर उमटली भारतमुद्रा! ISRO ने रचला इतिहास; दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 06:08 IST

आजचा 'लोकमत' इस्रोच्या शास्त्रज्ञांना समर्पित... प्रत्येक भारतीय म्हणतोय... गर्व आहे आम्हाला इस्रोच्या शास्त्रज्ञांचा

  • विक्रम लँडर, प्रग्यान रोव्हरचे यशस्वी सॉफ्ट लँडिंग
  • इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या अनेक वर्षांच्या प्र'ग्यान'चे यश
  • ‘विक्रम’चे यशस्वी लँडिंग, प्रग्यान रोव्हरही उतरले चंद्रावर

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: २३ ऑगस्ट २०२३. बुधवारी संध्याकाळची वेळ... अनेकांच्या हृद्याची धडधड वाढली होती. चंद्रयान-३च्या विक्रम लँडरच्या सॉफ्टलँडिंगच्या लाइव्ह स्ट्रिमिंगकडे असंख्य लोक डोळे लावून बसले होते. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी इस्रोमधील शास्त्रज्ञांनी घेतलेल्या अथक परिश्रमांना गोड फळ आले. चंद्रयान-३चे विक्रम लँडर, प्रग्यान रोव्हर हे चंद्राच्या पृष्ठभागावर दाखल झाले असून आता तेथील सखोल संशोधनाला झाली आहे. विक्रम लँडर चंद्रावर उतरण्याच्या काही क्षण आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जोहान्सबर्ग येथून लाइव्ह स्ट्रिमिंगमध्ये सहभागी झाले. चंद्रावर भारतमुद्रा उमटल्याच्या भव्य यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसह देशातील सर्व पक्षांच्या नेत्यांनी इस्रोचे तोंड भरून कौतुक केले आहे तसेच या अवकाश संशोधन संस्थेच्या भावी प्रकल्पांना शुभेच्छा दिल्या आहेत.

कसे झाले सॉफ्ट लॅंडिंग?

संध्याकाळी ५.४४ सुरुवात 

चंद्रयान-३ ने ऑटोमॅटिक लॅंडिंग सिक्वेन्स प्रक्रियेला संध्याकाळी ५.४४ सुरुवात केली. त्यानंतर सॉफ्ट लॅंडिंग आवश्यक असलेल्या विविध चार टप्प्याला सुरुवात झाली.

संध्याकाळी ५.४४ वाजता रफ ब्रेकिंग फेज

रफ ब्रेकिंग फेजला सुरुवात झाली. या फेजमध्ये लॅंडरची गती अवघ्या १० मिनिटांमध्ये ६००० किमी प्रतितासावरून टप्प्याटप्प्याने अवघ्या ५०० किमी प्रतितासांवर आणत चंद्राच्या पृष्ठभागापासून लँडर ७.४३ किमी अंतरावर आले.

संध्याकाळी ५.५६ वाजता अटिट्यूड होल्ड फेज

लँडरने अटिट्यूड होल्ड फेज पूर्ण केला. अवघे दहा सेकंद असलेल्या या फेजमध्ये लँडरचा प्रवास आडव्यावरून उभा म्हणजेच व्हर्टिकल लँडिंगसाठी सज्ज झाला. चंद्राचे काही फोटो टिपत त्याने फाईन ब्रेकिंग फेजमध्ये प्रवेश केला. या टप्प्यात लँडर चंद्रापासून ८०० मीटर उंचीवर आले.

संध्याकाळी ५.५९ वाजता फाईन ब्रेकिंग फेज

हा टप्पा पूर्ण करत लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या १ किमी अंतरावर आला. १७५ सेकंदाच्या या टप्प्यात लँडरने लॅंडिंगसाठी सुरक्षित जागेची चाचपणी केली. 

संध्याकाळी ६.०४ वाजता टर्मिनल डिसेंट फेज

६.०४ च्या सुमारास लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून १७५ मीटर अंतरावर आला. तत्पूर्वी त्याने लँडिंगची जागा निश्चित केली होती. या टप्प्याचे ७३ सेकंद पूर्ण करून विक्रम लँडरचे चंद्रावर ऐतिहासिक लँडिंग झाले.

गेल्या १४ जुलै रोजी इस्रोने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून चंद्रयान-३चे अवकाशात प्रक्षेपण केले होते. त्यानंतर या यानाने ४१ दिवसांत ३.८४ लाख किमीचा प्रवास करून अखेर चंद्राला गवसणी घातली. चंद्रयान-३मधील उत्तमरीत्या काम करणारी यंत्रणा व चंद्रावरील अनुकूल वातावरण या गोष्टींचा मेळ जमल्याने चंद्रयान-३च्या विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर दाखल झाला. त्यानंतर काही वेळाने रॅम्प उघडून त्यातून प्रग्यान रोव्हरही चंद्राच्या पृष्ठभागावर उतरला.

मी चंद्रावर उतरलोय... अन् भारतही

इस्रोने एक्स(पूर्वीचे ट्विटर)वर संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रयान-३ च्या वतीने, 'भारत, मी चंद्रावर पाेहाेचलाे आणि तुम्हीही' असे लिहून मिशन यशस्वी झाल्याची घोषणा केल्यावर अवघ्या तासाभरात ट्विटरवर तब्बल २९ ट्रेंड पाहायला मिळाले. बुधवारी संध्याकाळी चंद्रयान-३चा विक्रम लँडर योग्य पोझिशनमध्ये असताना इस्रोच्या टीमने ऑटोमॅटिक लँडिंग सिक्वेन्स (एएलएस) कार्यान्वित केले. त्यामुळे प्रथम विक्रम लँडर व त्यानंतर प्रग्यान रोव्हरने चंद्रावर दाखल होताच पहिले काम केले ते छायाचित्रे काढली व ती पृथ्वीवर पाठविली. चंद्रयान-३च्या यशानिमित्त झालेले ते एकप्रकारचे फोटोसेशनच होते.

विक्रम लँडर चंद्रावर उतरल्यानंतरचे छायाचित्र विक्रम लँडर चंद्रावर चार पाय रोवून उभा होता तेव्हा त्याने चंद्राचे फोटो काढले आणि भारताला पाठवले. त्यात त्याची चंद्रावर पडलेली सावलीही स्पष्ट दिसते. 

प्रग्यान रोव्हर लँडरमधून बाहेर पडल्यानंतरचे छायाचित्र : विक्रम लँडरमधून प्रग्यान रोव्हरही बाहेर पडले. त्याचे छायाचित्रही मिळाले आहे. भारताच्या चांद्रमोहिमेच्या यशाची पावती सर्व जगाला अशा स्वरूपात पाहायला मिळत आहे. 

अस्वस्थतेचे रूपांतर झाले जल्लोषात

इस्रोच्या बंगळुरू येथील टेलिमेट्री अँड कमांड सेंटरमधील मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्समध्ये (मॉक्स) इस्रोचे ५० शास्त्रज्ञ डोळ्यात तेल घालून चंद्रयान-३च्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून होते. मंगळवारची संपूर्ण रात्र इस्रोच्या शास्त्रज्ञांसाठी अधिक धावपळीची होती. चंद्रयान-३कडून मिळणारी माहिती विक्रम लँडरला पाठविली जात होती. शास्त्रज्ञ कोणताही धोका पत्करायला तयार नव्हते. या कमांड सेंटरमध्ये उत्साहाचे व काहीसे अस्वस्थतेचे वातावरण होते. जेव्हा विक्रम लँडर चंद्रावर दाखल झाला, त्या क्षणी इस्रोच्या कमांड सेंटरमध्ये शास्त्रज्ञांनी जल्लोष केला.

अजून एक इतिहास रचला!

चंद्राच्या पृष्ठभागावर चंद्रयान-३ सुखरूप उतरताच सोशल मीडियाच्या जगतातही भारताने इतिहास रचला. चंद्रयान ३ च्या ‘लाइव्ह स्ट्रीमिंग’ने जागतिक विक्रम मोडला. इस्रोच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर लँडिंग होताना सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटाला तब्बल ८०,५९,६८८ जणांनी लाइव्ह सोहळा पाहिला. फिफा विश्वचषक २०२२ मध्ये उपांत्यपूर्व फेरीत ब्राझील विरुद्ध क्रोएशिया सामन्यादरम्यान ६.५ दशलक्ष दर्शक मिळवणाऱ्या युट्यूबर कॅसिमिरोच्या नावावर यापूर्वीचा विक्रम होता.

आता पुढे 14 दिवस काय होणार?

लँडर काय करेल?

चंद्रयान ३ च्या विक्रम लँडरवर पूर्वीच्या तुलनेत अद्यययावत सेन्सर आणि कॅमेऱ्यांचा वापर केला आहे. त्यात प्रामुख्याने लेझर डॉपलर व्हेलोसिमीटर, लँडर होरिझॉंटल व्हेलोसिटी कॅमेरा, लेझर गायरो बेस्ड इनर्शियल रेफरन्सिंग व एक्सिलेरोमीटर यांचा समावेश आहे. लँडरवरील रंभा (रेडिओ ॲनाटॉमी ऑफ मून बाउंड हायपरसेन्सिटिव्ह आयनोस्फिअर अँण्ड ॲडमोस्पिअर) या पेलोडकडून चंद्रावरील विविध आयन्स व इलेक्ट्रॉन्सची घनता आणि काळानुरूप त्यातील बदल टिपले जाईल. ChaSTE म्हणजेच चंद्राज सरफेस थर्मो फिजिकल एक्सपेरिमेंट हा पेलोड चंद्राच्या पृष्ठभागाच्या भौतिक गुणधर्माचा अभ्यास करेल. आयएलएसए हा पेलोड भूकंप क्षमतेसह पृष्ठभागाच्या आवरणाचा अभ्यास करेल.

रोव्हर काय करेल?

रोव्हरवर लावण्यात आलेल्या नेव्हिगेशन कॅमेऱ्याच्या मदतीने तसेच एलआयबीएस पेलोडच्या चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यात येणार आहे. चंद्रयान-३ मोहिमेचा मुख्य उद्देश हा रोव्हरला चंद्राच्या पृष्ठभागावरून मार्गक्रमण करवणे आहे. रोव्हरवरील अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (एपीएक्सएस) हा चंद्रावरील माती आणि खडकांमधील मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम,  टिटॅनियम, लोह आदी खनिजांचा शोध घेईल. रोवरच्या लेझर इन्ड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप (एलआयबीएस) पेलोडकडून चंद्राच्या पृष्ठभागावरील रसायने आणि खनिजांचा संख्यात्मक आणि गुणात्मक अभ्यास केला जाईल.

दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश

नवी दिल्ली :  जगभरातील अब्जावधी लोकांना ज्याची प्रतीक्षा होती तो सुवर्णक्षण अवतरला. चंद्रयान-३च्या विक्रम लँडरचे बुधवारी संध्याकाळी सहा वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग झाले. त्यावेळी इस्रोचे शास्त्रज्ञ, पंतप्रधान नरेंद्र मोदी, करोडो भारतीय व जगभरातील नागरिकांनी या ऐतिहासिक क्षणाचे जोरदार स्वागत केले. चंद्रावर अवकाशयान उतरविणाऱ्या अमेरिका, रशिया, चीन या देशांमध्ये आता भारताचाही समावेश झाला आहे.

इस्रोवर जगभरातून कौतुकाचा महावर्षाव

अमेरिका : ‘चंद्रयान-३चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केल्याबद्दल इस्रोचे अभिनंदन. चंद्रावर अंतराळ यानाचे यशस्वीरीत्या सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश बनल्याबद्दल भारताचे अभिनंदन! या मोहिमेमध्ये तुमचा भागीदार असल्याचा आम्हाला आनंद आहे,’ अशी पोस्ट नासाचे बिल नेल्सन यांनी सोशल मीडियावर केली.

युरोप : अविश्वसनीय! तमाम भारतवासीयांचे आणि इस्त्रोचे अभिनंदन! नवे तंत्रज्ञान प्रदर्शित करण्याचा आणि दुसऱ्या खगोलीय पिंडावर भारताचे पहिले सॉफ्ट लँडिंग साध्य करण्याचा किती चांगला मार्ग आहे. खूप छान, मी पूर्णपणे प्रभावित झालो आहे, अशा शब्दांत युरोपियन स्पेस एजन्सीच्या महासंचालकांनी कौतुक केले. पुढे, आम्हीदेखील यातून खूप चांगले धडे शिकत आहोत, असेही लिहिले.

हा एक अविस्मरणीय क्षण आहे आणि शास्त्रज्ञांनी इतिहास रचून भारताचा गौरव केला आहे. ही एक अशी घटना आहे जी आयुष्यात एकदाच घडते. मी इस्रोचे, चंद्रयान-३ मोहिमेत सहभागी असलेल्या सर्वांचे अभिनंदन करते आणि त्यांना पुढील मोठ्या यशासाठी शुभेच्छा देते. -द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती

भारताची यशस्वी चंद्रमोहीम ही केवळ आमच्याच देशापुरती नव्हती. वसुधैव कुटुंबकम ही भारताची भूमिका आहे. मानवजातीला केंद्रीभूत मानून चंद्रयान-३ मोहीम आखण्यात आली होती. त्यामुळे चंद्रावर भारताने ठेवलेले पाऊल हे यश साऱ्या मानवजातीचे आहे.-नरेंद्र माेदी, पंतप्रधान

चंद्रयान-३ च्या मोहिमेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी प्रत्येक जाणकाराने आम्हाला योग्य सूचना केल्या. त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला.-डाॅ. एस. साेमनाथ, अध्यक्ष, इस्राे.

टॅग्स :Chandrayaan-3चंद्रयान-3isroइस्रोIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी