जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे फिरायला आलेल्या लोकांवर गोळीबार करून, त्यांची हत्या करण्यात आली. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' करून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त केली. भारताच्या या कृतीने अस्वस्थ झालेल्या पाकिस्ताननेही आपल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी भारतातील अनेक भागात हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय संरक्षण यंत्रणेने सर्व हल्ले हाणून पाडले.
प्रत्युत्तरादाखल भारतानेही पाकिस्तानच्या ११ हवाई तळांना लक्ष्य केले आणि ते पूर्णपणे उद्ध्वस्त केले. पाकिस्तानने भारतीय लष्करी कारवाईला खोटे ठरवण्याचा प्रयत्न वारंवार केला असला तरी, भारताने याचे सर्व पुरावे सादर केले आहेत. या दरम्यान पाकिस्तानमधून असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यात त्यांनी स्वतः हल्ल्याची कबुली दिली आहे. आता देखील एका पाकिस्तानी नेत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने स्वतःच्याच सरकारची कानउघडणी केली आहे.
कोणीही विचारत नाही की भारत इतक्या आत कसा आला!
एका पाकिस्तानी सिनेटरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामध्ये त्याने असा दावा केला आहे की, भारतीय हवाई दलाने केवळ पाकिस्तानात प्रवेश केला नाही तर पाकिस्तानच्या एअरबेसला लक्ष्य करून तो नष्ट केला. व्हायरल व्हिडीओमध्ये, पाकिस्तानी सिनेटर म्हणत आही की, "भारताने चकलाला एअरबेसवर येऊन हल्ला केला, आमचे आर्मी जीएचक्यू त्याच्या अगदी जवळ होते. पण, कोणीही विचारत नाही की भारत इतक्या आत कसा आला."
या व्हिडीओने पुन्हा एकदा पाकिस्तानची पोलखोल केली आहे. भारताच्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, पाकिस्तानी सरकार या सगळ्या गोष्टींवर पडदा टाकण्याचे काम करत आहे. आता संतप्त नागरिक आणि नेते पाकिस्तानी सरकारला खडे बोल सुनावत आहेत.