रामलीला मैदानावर इंडिया आघाडीच्या 'लोकतंत्र बचाओ' रॅलीला आता सुरुवात झाली आहे. या रॅलीमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधातही आवाज उठवला जात आहे. याच दरम्यान अनेक नेत्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्रात भाजपाची सत्ता राहिल्यास संविधान वाचणार नाही, असा लोकांचा विश्वास आहे, असं आपचे नेते दिलीप पांडे यांनी म्हटलं. "ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय एजन्सींना विरोधी पक्षांच्या मागे पाठवलं जात आहे."
"भाजपाच्या हुकूमशाहीचं हे सर्वात मोठं उदाहरण आहे. या गुंडगिरी आणि हुकूमशाहीच्या विरोधात लोक येथे जमत आहेत आणि भाजपाला सांगत आहेत की ते त्यांच्या इच्छेनुसार हा देश चालवू शकत नाहीत" असंही दिलीप पांडे यांनी सांगितलं. इंडिया आघाडीच्या रॅलीबाबत पंजाब सरकारचे मंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते बलबीर सिंग म्हणाले की, "आम्हाला हुकूमशाही संपवायची आहे आणि लोकशाही आणि संविधान वाचवायचं आहे. ही इंडिया आघाडीची मेगा रॅली आहे."
"नेते येऊन भविष्यातील रणनीतीची माहिती देतील. 140 कोटी भारतीय अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करत आहेत. भ्रष्ट लोक भाजपामध्ये सामील होत आहेत आणि प्रामाणिक लोक तुरुंगात आहेत." दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी देखील भाजपावर हल्लाबोल केला आहे. "आम्ही दिल्लीच्या रस्त्यावर उतरलो आणि आम्ही पाहिले की अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात लोकांमध्ये रोष आहे. मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकणं हे लोकांना पटलं नाही."
"अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात आज दिल्लीच्या रामलीला मैदानावर मेगा रॅली काढण्यात आली आहे. आमच्या सर्व पाहुण्यांचे विमानतळावर प्रोटोकॉलनुसार स्वागत केले जाईल. यामध्ये भारत आघाडीचे सर्व पक्ष आणि त्यांचे नेते सहभागी होणार आहेत. देशाला मोठा संदेश जाणार असून ते भाजपासाठी मोठे आव्हान असेल" असं सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं आहे.
दिल्ली सरकारचे मंत्री आणि आप नेते राज कुमार आनंद म्हणाले की, "संविधानाच्या विरोधात कारवाई केली जात आहे, ही संपूर्ण हुकूमशाही आहे. याविरोधात आम्ही आवाज उठवत आहोत. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा कोणताही पुरावा नसून त्याचा निषेध करण्यासाठी इंडिया आघाडीतर्फे रॅली काढण्यात येत आहे."