Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ नागरिकांची हत्या केल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर भारताने शेजारील देश पाकिस्तानबाबत आक्रमक भूमिका घेत कठोर पावले उचलली आहेत. सिंधू जल करार स्थगित करण्यासह पाच महत्त्वाचे निर्णय घेतल्यानंतर पाकिस्ताननेभारताला इशारा दिला होता. अनेक पाकिस्तानी नेत्यांनी भारताला धमकावलं होतं. त्यानंतर आता भारताला इशारा देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची बोलती बंद करण्यात आली आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने मंगळवारी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचे एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंट ब्लॉक केले. पहलगाम हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, त्यातील बहुतेक पर्यटक होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ हे सतत भारताविरुद्ध गरळ ओकत आहेत. भारताला त्यांनी अणुहल्ल्याची धमकी देखील दिली होती. त्यानंतर आता पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांना भारतात गप्प करण्यात आले आहे.