Delhi AI Summit: भारताची राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानावरील भारत मंडपम येथे सोमवारपासून इंडिया एआई इम्पॅक्ट समिट २०२६ या जागतिक परिषदेला सुरुवात झाली. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, पहिल्याच दिवशी अलोट गर्दी आणि नियोजनातील त्रुटींमुळे मोठा गोंधळ पाहायला मिळाला. स्टार्टअपचे संस्थापक आणि परदेशी पाहुण्यांना झालेल्या त्रासानंतर केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अखेर जाहीर माफी मागितली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या समिटसाठी जगभरातून हजारो प्रतिनिधी, स्टार्टअप्स आणि टेक दिग्गज पोहोचले. मात्र, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा आणि अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी यामुळे सामान्यांचे हाल झाले. सकाळी ९:३० वाजता समिट सुरू होण्यापूर्वीच भारत मंडपमबाहेर हजारो लोकांच्या रांगा लागल्या होत्या. तासनतास ताटकळत राहावे लागल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला. एआय सारख्या तंत्रज्ञान परिषदेतच वाय-फाय आणि मोबाईल नेटवर्कची कनेक्टिव्हिटी अत्यंत खराब असल्याचे समोर आले. सुरक्षा कारणास्तव अचानक स्टॉल्स रिकामे करण्यास सांगितल्याने प्रदर्शकांचे मोठे नुकसान झाले.
मौल्यवान उपकरणांची चोरी; स्टार्टअप संस्थापकांचा आरोप
या अव्यवस्थेचा सर्वात मोठा फटका नवउद्योजकांना बसला. सोशल मीडियावर अनेकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. "सुरक्षेच्या नावाखाली आम्हाला अचानक स्टॉलबाहेर काढले. आमच्या उपकरणांच्या सुरक्षेची ग्वाही दिली गेली, पण नंतर आमचे किमती एआय वियरेबल डिव्हाईस तिथून चोरीला गेले. हे अत्यंत निराशाजनक आहे," असं धनंजय यादव यांनी सांगितले. स्टार्टअप संस्थापकांना तासनतास बाहेर उभे राहावे लागले तसेच भारताचे एआय भवितव्य असे घडवता येणार नाही, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
मंत्री अश्विनी वैष्णव यांची माफी
मंगळवारी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिलगिरी व्यक्त केली. "आयोजनाबाबत लोकांचा उत्साह अभूतपूर्व आहे. मंगळवारी ७०,००० हून अधिक लोक सहभागी झाले. पहिल्या दिवशी काही त्रुटी राहिल्या, त्याबद्दल आम्ही क्षमा मागतो. आता व्यवस्था सुचारू करण्यासाठी २४ तास कार्यरत असणारी वॉर रूम तयार करण्यात आली आहे," असे अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह जगातील बडे नेते यात सहभागी होत आहेत. तसेच ओपन एआयचे सॅम ऑल्टमॅन आणि अँथ्रोपिकचे डारियो अमोदेई बुधवारी या समिटला संबोधित करणार आहेत. ७०,००० स्क्वेअर मीटर पेक्षा मोठ्या परिसरात १० वेगवेगळ्या मैदानांमध्ये हे समिट पसरलेले आहे. हे समिट २० फेब्रुवारीपर्यंत असून, उर्वरित दिवसांत गर्दीचे नियोजन आणि सुरक्षा व्यवस्था अधिक सुटसुटीत करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे.
Web Summary : Delhi's AI summit faced chaos: theft, long queues. Minister Vaishnaw apologized for mismanagement after attendees, including startups, faced connectivity issues and security disruptions. A war room is now active to streamline operations for the remaining days.
Web Summary : दिल्ली के एआई शिखर सम्मेलन में अराजकता: चोरी, लंबी कतारें। स्टार्टअप सहित उपस्थित लोगों को कनेक्टिविटी समस्याओं और सुरक्षा व्यवधानों का सामना करने के बाद मंत्री वैष्णव ने कुप्रबंधन के लिए माफी मांगी। संचालन को सुव्यवस्थित करने के लिए अब एक युद्ध कक्ष सक्रिय है।