PM Narendra Modi Addressed From Red Fort On Independence Day 205: या पिढीने समृद्ध भारताचे ध्येय ठेवले पाहिजे. मी सर्व प्रभावशाली व्यक्ती, सर्व राजकीय पक्षांचा यासाठी आवाहन करतो. हा कोणत्याही एका विशिष्ट पक्षाचा अजेंडा नाही, भारत देश सर्वांचा आहे, आपण एकत्रितपणे स्थानिकांसाठी व्होकल फॉर लोकल हा मंत्र बनवला पाहिजे. स्वदेशी उत्पादनांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. फक्त स्वदेशी उत्पादने खरेदी केली पाहिजेत. व्होकल फॉर लोकल या माध्यमातून आपण भारत देशाला समृद्ध करू शकतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विषयांवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले. तसेच मेक इन इंडिया अंतर्गत फायटर जेट विमाने तयार करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. यासाठी पंतप्रधान मोदी यांनी देशातील शास्त्रज्ञांना, संशोधकांना पुढे येण्याचे आवाहन केले. तसेच हा काळ माहिती तंत्रज्ञान आणि डेटाचा आहे. स्वदेशी ऑपरेटिंग सिस्टम, सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता असणे ही काळाची गरज आहे. काम करणाऱ्यांना आपल्यातील कौशल्य, बलस्थाने माहिती असायला हवीत. सोशल मीडिया आहे, इतर प्लॅटफॉर्म आहेत, आम्ही सिद्ध करून दाखवले आहे की, आमचे यूपीआय प्लॅटफॉर्म जगासाठी वापरात येऊ शकतात. आमच्याकडे क्षमता आहे. कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. मला तुमच्यावर विश्वास आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
आता मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य
भारत प्रत्येक क्षेत्रात एक आधुनिक इकोसिस्टिम निर्माण करत आहे. तरुणांना आणि सरकारच्या प्रत्येक विभागाला आवाहन करतो की, आपण आपल्या लढाऊ विमानांसाठी मेड-इन-इंडिया जेट इंजिन तयार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्याला जगाची फार्मसी म्हणून ओळखले जाते, परंतु संशोधन आणि विकासात अधिक गुंतवणूक करणे ही काळाची गरज नाही का? मानवतेच्या कल्याणासाठी सर्वोत्तम आणि परवडणारी औषधे आपणच पुरवणारे असू नये का? असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केले. तसेच लाल किल्ल्यावर कोणत्याही सरकारवर टीका करण्यासाठी नाही. पण देशातील तरुणांना त्याबद्दल माहिती असायला हवी. सेमी कंडक्टरवर काम ५०-६० वर्षांपूर्वी आपल्या देशात सुरु झाले. सेमी कंडक्टर प्रकल्पाची कल्पना ५०-६० वर्षांपूर्वी आली. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ही सेमी कंडक्टरची कल्पना ५०-६० वर्षांपूर्वी मारून टाकली. आपण ५०-६० वर्षे गमावली. आम्ही मिशन मोडवर सेमी कंडक्टरबाबत काम करत आहोत. या वर्षाच्या अखेरीस भारतीयांनी बनवलेल्या मेड इन इंडिया सेमी कंडक्टर चीप बाजारात येतील, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आपले ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला अंतराळ स्थानकावरून परतले आहेत. हा देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. भारत गगनयान मोहिमेवर सक्रियपणे काम करत आहे आणि स्वतःचे अंतराळ स्थानक बनवण्याची योजना आखत आहे. आपल्या देशाचे भाग्य बदलण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे. मी तरुणांना आवाहन करतो की, पुढे या आणि राष्ट्रीय परिवर्तनाच्या या मोहिमेत योगदान द्या, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.