आज देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजधानी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशवासियांना संबोधित केले. गेल्या काही काळापासून देशातील विविध राज्यांमध्ये भाषेच्या प्रश्नांवरून होत असलेल्या वादांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी देशातील विविधतेचा उल्लेख करत मोठं विधान केलं. आपल्या सर्व भाषा जेवढ्या समृद्ध होतील. तेवढं आपल्या ज्ञानव्यवस्थेला सामर्थ्य मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
स्वातंत्र्यदिनी देशवासियांना संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘’आपल्या संस्कृतीची ताकद ही आपली विविधता आहे. आम्ही ही विविधता साजरी करू इच्छितो. ही विविधता साजरी करण्याची सवय लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. भारत नावाचा हा बगिचा वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांनी सजलेला आहे, ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. आपल्या देशात खूप विविधता आहे आही विविधता आमच्यासाठी एक खूप मोठा ठेवा आहे’’, असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
''आपला देश भाषांच्या विविधतेने भरलेला आहे. म्हणूनच आम्ही मराठी, आसामी, बांगला, पाली, प्राकृत या भाषांना अभिजात भाषांचा दर्जा दिला आहे. आपल्या भाषा जेवढ्या विकसित होतील. आपल्या सर्व भाषा जेवढ्या समृद्ध होतील. तेवढं आपल्या ज्ञानव्यवस्थेला सामर्थ्य मिळेल, असं माझं मत आहे’’, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
''आज डेटाचा जमाना आहे आणि त्यामध्ये ही ताकद जगासाठीही मोठी शक्ती ठरू शकते. एवढं सामर्थ्य आपल्या भाषांमध्ये आहे. आपल्याला आपल्या सर्व भाषांबाबत अभिमान वाटला पाहिजे.आपल्या सर्व भाषांच्या विकासासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे’’, असे आवाहनही नरेंद्र मोदी यांनी आज केले.
''मित्रांनो प्राचीन पांडुलिपींमध्ये आपल्या ज्ञानाचे भांडार भरलेले आहेत. मात्र त्यांच्याबाबत बऱ्यापैकी उदासिनता राहिलेली आहे. यावेळी आम्ही ज्ञान भारतम् योजनेंतर्गत देशभरात असे प्राचीन ग्रंथ आहेत, जिथे पांडुलिपी आहेत, जी प्राचीन कागदपत्रे आहेत. त्यांना शोधून शोधून आजच्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्या ज्ञानाचा पुढच्या पिढ्यांसाठी उपयोग व्हावा या दिशेने आम्ही काम करत आहोत’’, असेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.