दीडशे वर्षांची ब्रिटिशांची राजवट उलथवून लावत १५ ऑगस्टच्या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला होता. १५ ऑगस्ट ही भारतासाठी केवळ तारीख नाहीय तर स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकविण्याचा मान हा या दिवशी पंतप्रधानांना मिळतो. काही पंतप्रधानांनी एकापेक्षा जास्त वेळा या ठिकाणावरून तिरंगा फडकविला आहे. परंतू, असे दोन पंतप्रधान आहेत, ज्यांच्या भाग्यात हा क्षण आलाच नाही.
लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकविण्याची आणि देशवासियांना संबोधित करण्याची ही परंपरा १९४७ पासून म्हणजेच भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून अखंड सुरु आहे. या काळात अनेक पंतप्रधान देशाने पाहिले, परंतू दोन असे पंतप्रधान होऊन गेले ज्यांना हा सन्मान मिळू शकला नाही. यात एक पंतप्रधान असे होऊन गेले जे दोनदा पंतप्रधान पदावर बसले होते. त्यांच्याही नशिबी हा योग आला नाही.
२७ मे १९६४ रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंचे निधन झाले. तेव्हा गुलझारीलाल नंदा यांना देशाचे कार्यवाहक पंतप्रधान बनविण्यात आले. परंतू, १३ दिवसांचाच काळ त्यांना मिळाल्याने त्यांच्या या काळात १५ ऑगस्टचा दिवस आला नाही. ११ जानेवारी १९६६ ला पुन्हा नंदा देशाचे पंतप्रधान बनले. लाल बहादूर शास्त्रींचे निधन झाले होते. तेव्हाही त्यांचा कार्यकाळ १३ दिवसांचाच ठेवण्यात आला. अशाप्रकारे दोनवेळा पंतप्रधान होऊनही नंदा यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही.
दुसरे पंतप्रधान कोण?
1990-91 या काळात चंद्रशेखर हे भारताचे आठवे पंतप्रधान बनले. त्यांचा कार्यकाळ नंदा यांच्यापेक्षा खूप मोठा होता. जवळपास सहा महिने ते पंतप्रधान होते. देशात राजकीय अस्थिरता होती. त्यांना काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिलेला होता. परंतू, काही महिन्यांतच काँग्रेसने हा पाठिंबा काढून घेतला आणि चंद्रशेखर यांना राजीनामा द्यावा लागला. चंद्रशेखर यांचा हा कार्यकाळ होता १० नोव्हेंबर १९९० ते २१ जून १९९१. या काळात १५ ऑगस्ट आलाच नाही. यामुळे चंद्रशेखर यांना देखील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकविण्याचा मान मिळाला नाही.