मणिपूरमध्ये भाजप आमदार, नेत्यांची घरे जाळण्याचा प्रयत्न, हिंसक जमावाची सुरक्षा दलाबरोबर चकमक; दोन जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 06:18 AM2023-06-18T06:18:32+5:302023-06-18T06:18:43+5:30

इरिंगबाम पोलिस ठाण्यातून शस्त्रास्त्रे पळविण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.

In Manipur, BJP MLAs, Leaders' Houses Attempted To Burn, Violent Mobs Clash With Security Forces; Two people were injured | मणिपूरमध्ये भाजप आमदार, नेत्यांची घरे जाळण्याचा प्रयत्न, हिंसक जमावाची सुरक्षा दलाबरोबर चकमक; दोन जण जखमी

मणिपूरमध्ये भाजप आमदार, नेत्यांची घरे जाळण्याचा प्रयत्न, हिंसक जमावाची सुरक्षा दलाबरोबर चकमक; दोन जण जखमी

googlenewsNext

इम्फाळ / कोलकाता : मणिपूरमध्ये ३ मेपासून सुरू असलेला हिंसाचार अद्यापही सुरूच आहे. शुक्रवारी रात्री इम्फाळ शहरामध्ये सुरक्षा दलाचे जवान व हिंसक जमावामध्ये झालेल्या चकमकीत दोन जण जखमी झाले. संतप्त जमावाने भाजपचा एक आमदार व त्या पक्षाच्या नेत्यांची घरे जाळण्याचा प्रयत्न केला. मणिपूरच्या बिष्णूपूर जिल्ह्यातील क्वाक्ता आणि चुराचंदपूर जिल्ह्यातील कांगवाई येथे संपूर्ण रात्रभर गोळीबार सुरू होता, असे पोलिसांनी सांगितले. 
इरिंगबाम पोलिस ठाण्यातून शस्त्रास्त्रे पळविण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. हजार लोकांच्या जमावाने या शहरातील राजवाड्याजवळ असलेल्या इमारतींना आग लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून व रबरी गोळ्यांचा मारा करून जमावाला पांगविले. (वृत्तसंस्था)

नेत्याच्या घरात घुसून जमावाने केली तोडफोड
इम्फाळमध्ये भाजपचे आमदार बिस्वजित यांच्या घराला आग लावण्याचा व या शहरात भाजप महिला शाखेच्या अध्यक्षा शारदा देवी यांच्या घरात घुसून जमावाने तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा दलांनी त्वरित कारवाई करून या हिंसक जमावाला पांगविले.

आतापर्यंत अनेक मालमत्तांना आग
सुमारे दीड महिन्यापासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत अनेक मालमत्तांना आग लावण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री आर. के. रंजन सिंह यांच्या घरावर गुरुवारी रात्री हल्ला करण्यात आला होता. त्यांचे घर जाळण्याचा प्रयत्नही जमावाने केला होता. 

१० विरोधी पक्षांना करायची आहे पंतप्रधानांशी चर्चा : जयराम रमेश
मणिपूरमधील स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी त्या राज्यातील १० विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १० जून रोजी एक पत्र पाठवून भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, असा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला. अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी ते विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करतील अशी आशा आहे, असेही जयराम रमेश यांनी म्हटले.

काय आहे वाद?
मैतेई आणि कुकी समुदायांतील आरक्षणविषयक वादातून मणिपूर पेटले असून, आतापर्यंत १०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 
११ जिल्ह्यांत संचारबंदी लावण्यात आली आहे. अनुसूचित जातीचा (एसटी) दर्जा देण्याच्या मैतेई समुदायाच्या मागणीविरोधात मणिपूरच्या पहाडी जिल्ह्यांत ‘आदिवासी ऐक्य मार्च’चे आयोजन ३ मे रोजी करण्यात आले होते. तेव्हापासून राज्यात हिंसाचार सुरू आहे.

Web Title: In Manipur, BJP MLAs, Leaders' Houses Attempted To Burn, Violent Mobs Clash With Security Forces; Two people were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.