लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचे महत्त्वाचे कडवे १९३७ मध्ये वगळण्यात आले होते. त्यामुळे फाळणीची बीजे पेरली गेली आणि अशी फुटीर मानसिकता अजूनही देशासाठी एक आव्हान आहे, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी म्हटले आहे. वंदे मातरम् गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वर्षभराच्या स्मरणोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. त्यांनी येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये या प्रसंगी एक टपाल तिकीट आणि नाणे जारी केले.
वंदे मातरम् हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा आवाज बनले, ते प्रत्येक भारतीयाच्या भावना व्यक्त करत होते. दुर्दैवाने, १९३७ मध्ये वंदे मातरमचे महत्त्वाचे कडवे जे त्याच्या आत्म्याचा भाग होते, ते वगळण्यात आले. वंदे मातरमच्या विभाजनाने फाळणीची बीजेदेखील पेरली. राष्ट्र उभारणीच्या या ‘महामंत्रा’सोबत हा अन्याय का केला गेला, हे आजच्या पिढीला जाणून घेण्याची गरज आहे. ही फूट पाडणारी मानसिकता अजूनही देशासाठी एक आव्हान आहे, असे ते म्हणाले.
देशभरात विविध कार्यक्रम
वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, आसाम, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, सिक्कीम, गोवा, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, त्रिपुरा, ओडिशा, दिल्ली, राजस्थान आदी राज्यांत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
भाजप, संघानेच हे गीत टाळले : खरगे
देशाच्या सामूहिक आत्म्याला जागृत करणाऱ्या आणि भारताच्या स्वातंत्र्याचा आवाज बनलेल्या वंदेमातरमचा काँग्रेसला अभिमान आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे. भाजप आणि संघाने मात्र सार्वत्रिक आदर असलेले हे गीत टाळले आहे, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेस वंदेमातरमची अभिमानी ध्वजवाहक आहे. या गीतांचा काँग्रेसला अभिमान आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
‘वंदे मातरम्’ एकतेचे प्रतीक : राष्ट्रपती मुर्मू
‘वंदे मातरम्’ हे जनतेच्या भावनिक चेतनेचे आणि एकतेचे प्रतीक आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतमाता ‘सुजलाम्’, ‘सुफलाम्’ आणि ‘सुखदाम्’ ठेवण्याचा संकल्प करूया, असे त्यांनी म्हटले आहे.
देशाला एकसंध ठेवले : शाह
‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताने भारतीय स्वातंत्र्य चळवळीला दिशा दिली आणि स्वातंत्र्यानंतर देशाला एकसंध ठेवले, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.