नवी दिल्ली : भारत,अमेरिका यासह जगातील अनेक देशांमध्ये सध्या बेकायदेशीर स्थलांतरित हा चर्चेचा विषय ठरला आहे. अमेरिकेत सध्या बेकायदेशीर स्थलांतरितांना पकडून त्यांच्या देशात परत पाठवले जात आहे. तर दुसरीकडे भारतातही हा मुद्दा सध्या चर्चेत असून दिल्लीसह अनेक राज्यातील बेकायदेशीर स्थलांतरिताविरोधात आंदोलन केले जात आहे. अशातच आता भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी एक मोठे विधान केले आहे.
बेकायदेशीर स्थलांतरित हे भारताच्या सुरक्षेसाठी धोका असल्याचे जगदीप धनखड यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. सोमवारी (दि.२७) जगदीप धनखड यांनी राज्यसभा इंटर्नशिप कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका समूहाला संबोधित केले. यावेळी, बेकायदेशीर स्थलांतरित हे भारताच्या लोकशाहीसाठी धोका आहेत. कारण हे बेकायदेशीर स्थलांतरित आपल्या निवडणूक व्यवस्थेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असे जगदीप धनखड म्हणाले.
भारत सरकारला बेकायदेशीर स्थलांतरितांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे. पुढे जगदीप धनखड म्हणाले, बेकायदेशीर स्थलांतरित हे आपल्या सामाजिक सौहार्द आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी धोक्याचे आहे. आपल्याला आव्हानांकडे पाहावे लागणार आहे. देशासमोरील आव्हान म्हणजे लाखो बेकायदेशीर स्थलांतरित आपल्या भूमीवर राहत आहेत. हे आपल्या सार्वभौमत्वाला आव्हान नाही का? असे लोक आपल्या राष्ट्रवादाशी कधीही जोडले जाऊ शकत नाहीत, असेही जगदीप धनखड यांनी सांगितले.
याचबरोबर, आपल्या देशात लाखो बेकायदेशीर स्थलांतरित राहत आहेत. एखादा देश लाखो बेकायदेशीर स्थलांतरितांना कसे सहन करू शकतो? असा सवाल करत जगदीप धनखड म्हणाले की, बेकायदेशीर स्थलांतरित आपल्या आरोग्य, शिक्षण आणि इतर सुविधांच्या संसाधनांचा वापर करत आहेत. ते अशा नोकऱ्या करत आहेत, ज्या आपल्या लोकांसाठी आहेत. त्यामुळे मला आशा आहे की, सरकारमधील प्रत्येकजण या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करेल. ही समस्या आणि तिचे निराकरण एक दिवसही पुढे ढकलता येणार नाही, असेही जगदीप धनखड म्हणाले.