अहमदाबाद : बलात्कार होण्यापासून स्वत:ला वाचवायचे असेल तर घरीच थांबा, या आशयाचे पोस्टर्स गुजरातच्या अहमदाबाद शहरात लागल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. अहमदाबाद वाहतूक पोलिसांनी सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक भागात पोस्टर्स लावली आहेत. मात्र, यापैकी काही पोस्टर्सच्या माध्यमातून बलात्कार टाळायचा असेल तर घरी थांबवण्याचा सल्ला महिलांना दिल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
वाहतूक पोलिसांनी शहरातील काही भागांमध्ये ही पोस्टर्स लावली आहेत. रात्री उशिरा पार्टीला जाऊ नका. तुमच्यासोबत बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार होऊ शकतो. आपल्या मित्रांसोबत अंधारात किंवा निर्जनस्थळी जाऊ नका. तिथे तुमच्यावर बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार झाला तर? असा मजकूर लिहिलेली पोस्टर्स शहरातील चांदलोडिया क्षेत्रातील रस्त्याच्या दुभाजकांवर लावण्यात आली होती. मात्र, या पोस्टर्सवरून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरल्यानंतर वाहतूक विभागावर टीका होऊ लागली. त्यानंतर ही पोस्टर्स काढण्यात आली.
वाहतूक विभागाने जबाबदारी नाकारलीवाहतूक पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसंदर्भात एकही पोस्टर्स लावले नाही. पोलिसांनी लावलेली पोस्टर्स केवळ वाहतूक सुरक्षेसंदर्भात असल्याचा दावा पोलिस उपायुक्त (पश्चिम वाहतूक) नीता देसाई यांनी केला आहे. ‘सतर्कता ग्रुप’ नामक एका स्वयंसेवी संस्थेने वाहतूक पोलिसांच्या संमतीशिवाय ही वादग्रस्त पोस्टर्स लावली असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आम आदमी पक्षाने राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. आपने म्हटले की, राज्यात रोज ५ पेक्षा जास्त बलात्कार होत आहेत. या पोस्टर्समधून राज्यात महिला सुरक्षित नाहीत, हेच स्पष्ट होते. गुजरातमधील महिलांनी रात्री घराबाहेर पडू नये का? असेही आपने विचारले आहे.