विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने दिल्लीत तिरंगी लढत होत असून, सत्ता राखण्यासाठी आपने प्रचारात झोकून दिल्याचे चित्र आहे. आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आता नवी घोषणा दिली आहे. 'कमल का बटन खतरनाक है और झाडू घर की लक्ष्मी है', असे केजरीवाल म्हणाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अरविंद केजरीवाल म्हणाले, "दोन मुलांच्या शिक्षणात १० हजार रुपयांची बचत, उपचार आणि औषधींमध्ये ५ हजारांची बचत, मोफत वीज-पाणी आणि दोन ते अडीच हजारांपर्यंत बस भाड्यात बचत होत आहे. अशा प्रकारे आम आदमी पक्ष दर महिन्याला २२ ते २३ हजार रुपयांचा फायदा करू देत आहे. त्यामुळे म्हणतात की, 'झाडू आहे घराची लक्ष्मी'. जर चुकीचे बटन दाबले तर २२-२३ हजार कुठून आणणार? असा सवाल त्यांनी दिल्लीकरांना केला.
केजरीवाल पुढे म्हणाले, "मतदारांना पैसे आणि भेटवस्तू देऊन आमिष दाखवले जात आहे. त्याला मतदारांनी विरोध करावा."
केजरीवाल यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. विधानसभा निवडणुकीत मतदारांना प्रभावित करण्यासाठी भाजपकडून सोन्याची चैन, साड्या, बूट आणि पैसे वाटले जात आहेत, असे केजरीवाल म्हणाले.
"कोणालाही मत द्या, फक्त पैसे देणाऱ्याला देऊ नका"
'पैसे तुमचेच आहेत. पैसे घ्या, पण ११०० रुपये किंवा एका साडीसाठी तुमचे मत विकू नका. तुमचे मत अमूल्य आहे. तुमच्या मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवा. जर आपली मते खरेदी केली जात असेल, तर आपली लोकशाही संपून जाईल. फक्त श्रीमंत राज्य करतील. कोणालाही मत द्या, पण पैसे वाटणाऱ्याला देऊ नका", असे आवाहन केजरीवाल यांनी मतदारांना केले.