Rahul Gandhi On PM Narendra Modi: संसदेच्या दोन्ही सभागृहात मंगळवारी ऑपरेशन सिंदूरवर जोरदार चर्चा झाली. यावेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी केल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत २९ वेळा म्हटलं, जर हिंमत असेल तर पंतप्रधानांनी सभागृहात सांगावे की ट्रम्प खोटे बोलत आहेत, असे आव्हान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिले होते. त्यावर ऑपरेशन सिंदूर सुरू असताना जगातील कोणत्याही देशाने भारताला स्वतःच्या सुरक्षेसाठी कारवाई करण्यापासून रोखले नाही, असे प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं. त्यावर आता डोनाल्ड ट्रम्प हे ट्रेड डीलसाठी भारतावर दबाव आणत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं.
"हवाई हल्ला केल्यानंतर सरकारने आधीच पाकिस्तान सरकारसमोर शरणागती पत्करली. कारण या हवाई हल्ल्यांचा उद्देश फक्त पंतप्रधानांची प्रतिमा सुधारणे हाच होता. त्यामुळे हवाई दलाचा वापर करून त्यांची प्रतिमा सुधारण्यात आली. पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये इंदिरा गांधींच्या तुलनेत ५० टक्केही हिंमत असेल, तर त्यांनी संसदेत सांगावं की डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत आणि त्यांनी हा संघर्ष थांबवला नाही," असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी जगातील कोणत्याही नेत्याने भारताला पाकिस्तानविरुद्ध कारवाई थांबवण्यास सांगितले नव्हते असं म्हटलं. मात्र आता पुन्हा एकदा राहुल गाधींनी टीका केली आहे. "सत्य हेच आहे. जर पंतप्रधान मोदींनी बोलून टाकलं तर डोनाल्ड ट्रम्प मोकळेपणाने सर्वच बोलतील आणि ते सगळं सत्य समोर आणतील. त्यामुळे पंतप्रधान मोदी बोलत नाहीयेत. डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या ट्रेड डीलसाठी हे सगळं बोलत आहेत. त्यामुळे ते दबाव निर्माण करत आहेत. ट्रेड डील कशी होते ते तुम्ही बघा," असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
काँग्रेसला जवानांच्या शौर्याची पाठराखण करता आली नाही
"पाकव्याप्त काश्मीर अद्याप परत का घेतले नाही, असा प्रश्न विचारण्याआधी काँग्रेसने हा प्रदेश गमावला कुणी, याचे प्रथम उत्तर द्यावे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळापासून काँग्रेसने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांच्या वेदना भारत आजही सहन करत आहे. संपूर्ण जग भारताच्या बाजूने उभं राहिलं पण काँग्रेस आणि त्यांच्या घटक पक्षांना मात्र आपल्या जवानांच्या शौर्याची पाठराखण करता आली नाही," अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.