लखनऊ: IAS अधिकाऱ्यांच्या साधेपणाचे अनेक किस्से आपण ऐकत आणि पाहत असतो. अशाच प्रकारची एक घटना उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये घडली आहे. उत्तर प्रदेशातील एका जेष्ठ IAS अधिकाऱ्यानं चक्क रस्त्यावर बसून भाजीपाला विकलाय. त्यांचा भाजी विकतानाचा फोटो त्यांच्या एका मित्रानं सोशल मीडियावर व्हायरल केला. एक IAS अधिकाऱ्यला रस्त्यावर भाजी विकताना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. पण, यामागचं कारणही भावूक करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावर भाजीपाला विकणारे अधिकारी दुसरे-तिसरे कुणी नसून डॉ. अखिलेश मिश्रा आहेत. ते उत्तर प्रदेशच्या परिवहन विभागात विशेष सचिव आहेत. अधिकारी होण्याव्यतिरिक्त, ते एक चांगले कवी देखील आहे. बऱ्याचदा काव्य संमेलनांमध्ये ते आपल्या कविता सादर करतात.
भाजी विकण्याचं सांगितलं कारण
सोशल मीडियावर त्यांचा भाजी विकल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अखिलेश मिश्रा यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, 'मी काल सरकारी कामानिमित्त प्रयागराजला गेलो होतो. परत येत असताना, एका ठिकाणी भाजी घ्यायला उतरलो. भाजी विक्रेती एक वृद्ध महिला होती. तिनं मला थोड्या वेळात येते असं सांगून काहीवेळ दुकानावर लक्ष ठेवण्यास सांगितलं. मी तिच्या दुकानात बसलो असताना मित्रानं माझा फोटो काढला आणि पोस्ट केला, अशी माहिती त्यांनी दिली.