भोपाळ: मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील जिल्हाधिकाऱ्याने(IAS) परीक्षा सुरू असताना एका विद्यार्थ्याला मारहाण केली. ही घटना १ एप्रिल २०२५ ची असून, सध्या या घटनेचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये दिसणारे अधिकारी भिंड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजीव श्रीवास्तव आहेत. दीनदयाळ डांगरोलिया महाविद्यालयात बीएससी द्वितीय वर्षाचा गणिताचा पेपर सुरू असताना, त्यांनी एका विद्यार्थ्याला मारहाण केली. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, श्रीवास्तव विद्यार्थ्याजवळ येतात आणि बेंचवरुन ओढून एकामागून एक गालात चापटा मारतात. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, ते त्याच विद्यार्थ्याला स्टाफ रुममध्ये नेऊन मारताना दिसतात.
पीडित विद्यार्थी रोहित राठोडने आरोप केला आहे की, मारहाणीमुळे त्याच्या कानाला गंभीर इजा झाली आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संजीव श्रीवास्तव यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या कृत्याचा बचाव केला. ते म्हणाले की, त्यांना या कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात कॉपी सुरू असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. काही विद्यार्थी कॉपीचे रॅकेट चालवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, जिल्हाधिकारी संजीव श्रीवास्तव यांनी चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठाने सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित एका खटल्याची सुनावणी करताना, श्रीवास्तव यांच्या वर्तनावर भाष्य करताना म्हटले होते की, अशा अधिकाऱ्याने या क्षेत्रात काम करावे की नाही, हे मुख्य सचिवांनी ठरवावे. तसेच, सध्या भिंडमध्ये तैनात असलेल्या तहसीलदार माला शर्मा यांनी जिल्हाधिकारी श्रीवास्तव आणि एसडीएम पराग जैन यांच्यावर मानसिक छळाचा आरोप केला आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, या छळामुळे मला काही झाले, तर त्याची जबाबदारी जिल्हाधिकारी संजीव श्रीवास्तव आणि पराग जैन यांची असेल.