चेन्नईमध्ये अन्ना युनिव्हर्सिटीमध्ये एका विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने तामिळनाडूमधील वातावरण तापवलं आहे. आज या घटनेविरोधात आंदोलन करणाऱ्या भाजपा नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या नेत्यांमध्ये माजी राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन आणि उपाध्यक्ष कारू नागराजन यांचा समावेश आहे. आंदोलकांकडून आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात येत होती. दरम्यान, आंदोलकांवर करण्यात आलेल्या कारवाईविरोधात अन्नामलाई यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच जोपर्यंत राज्यातील डीएमकेचं सरकार कोसळत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा अन्नामलाई यांनी केली आहे.
त्याबरोबरच अन्नामलाई यांनी शुक्रवारी कोईंबतूर येथील आपल्या निवासस्थानी स्वत:वर सहा फटके मारून घेणार आहेत. तसेच राज्यात भगवान मुरुगन यांच्या सहा पवित्र धामांना भेट देण्यासाठी ४८ दिवसांपर्यंत उपवास ठेवणार आहेत.
भाजपाचेतामिळनाडूमधील प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांनी सांगितले की, जोपर्यंत डीएमके सरकारला उखडून फेकत नाही, तोपर्यंत मी अनवानी चालेन. नेहमीप्रमाणे आम्ही निवडणूक जिंकण्यासाठी पैसे वाटणार नाही. आम्ही पैसे न वाटता निवडणूक लढवणार आहोत. तसेच डीएमकेचं सरकार सत्तेतून जात नाही, तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही.