जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक गेल्या दोन आठवड्यांपासून दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार घेत आहेत. मलिक यांच्याविरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले असून या आरोपपत्रावर मलिक यांनी प्रतिक्रिया दिली. मलिक यांनी खोटे आरोप करू नयेत आणि ते सध्या एका खोलीच्या घरात राहत असून कर्जातही बुडालेले आहेत, असं त्यांनी पोस्टमध्ये सांगितले.
किरू जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित कथित भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने नुकतेच मलिक यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. यानंतर, मलिक यांनी एक फोटो शेअर केला आणि सांगितले की, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
सत्यपाल मलिक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये लिहिले की, "मी गेल्या २ आठवड्यांपासून रुग्णालयात दाखल आहे आणि फक्त दोन दिवसांपूर्वीच मोदी सरकारच्या सीबीआय एजन्सीने माझ्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. मी माझ्या देशवासियांना सांगू इच्छितो की मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मी माझ्या राजकीय जीवनात पूर्णपणे प्रामाणिक राहिलो आहे, शेतकरी मसीहा, दिवंगत चौधरी चरण सिंह जी यांनी स्थापित केलेल्या तत्त्वांचे पालन केले आहे. मी या आरोपपत्राला घाबरणार नाही. ज्या निविदेत मला आरोपपत्रात अडकवले जात आहे, त्याबाबत मी स्वतः पंतप्रधान मोदींना सांगितले होते की त्यात भ्रष्टाचार आहे, म्हणून मी ते रद्द केले होते आणि माझ्या बदलीनंतर ही निविदा पुन्हा काढली.
"मी तुम्हाला ज्या भ्रष्टाचाराबद्दल सांगितले होते त्याचा तपास किती पुढे गेला आहे हे मोदीजी आणि सीबीआयने देशवासीयांना सांगावे?, असा सवालही मलिक यांनी पोस्टमध्ये केला. "सरकारी संस्था सीबीआय, ईडी, जर तुम्ही प्रामाणिक असाल तर देशवासीयांना सांगा की माझी संपत्ती किती वाढली आहे, जर माझी संपत्ती वाढली नसेल तर माझ्यावर खोटे आरोप करू नका, असंही या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मलिक म्हणाले, सत्य हे आहे की मी एका खोलीच्या घरात राहतो आणि मी स्वतः कर्जबाजारी आहे. मोदीजी, तुम्हाला आणि तुमच्या सरकारी यंत्रणांना माझी नम्र विनंती आहे की मला खोटारडे सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका, माझ्या देशवासीयांमध्ये माझ्याविरुद्ध द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, जर तुमच्यात हिंमत असेल तर प्रामाणिकपणे तपास करा जेणेकरून सत्य बाहेर येईल.
सत्यपाल मलिक यांनी पुढे म्हटले की, "सत्यमेव जयते, प्रामाणिकपणा आणि सत्यतेने, मी हुकूमशाही सरकारच्या विरोधात ठामपणे उभा आहे."
सीबीआयने कोणत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले?
किरू जलविद्युत प्रकल्पाच्या २,२०० कोटी रुपयांच्या नागरी कामांच्या कंत्राटात झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली केंद्रीय अन्वेषण विभागाने जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आणि इतर सात जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.
तीन वर्षांच्या तपासानंतर एजन्सीने विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले, यामध्ये मलिक आणि त्यांचे दोन सहकारी वीरेंद्र राणा आणि कंवर सिंग राणा यांच्या नावाचा समावेश आहे. आरोपपत्रात नाव असलेल्या इतरांमध्ये चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक एमएस बाबू, कंपनीचे संचालक अरुण कुमार मिश्रा आणि एमके यांचा समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.