गरबा खेळत असताना एका तरुणीचे दिवसाढवळ्या पिस्तुलाच्या जोरावर अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात ही घटना घडली असून, आरोपींनी गरबा मैदानावर इतर महिलांसमोरच या तरुणीला जबरदस्तीने ओढत नेले. विशेष म्हणजे, हे अपहरण तरुणीचे माहेरचे आणि सासरचे असे दोन्हीकडील लोकांनी मिळून केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचे फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकी घटना काय घडली?ही घटना मंदसौर कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील खानपुरा येथील भावसार धर्मशाळेत शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. या ठिकाणी महिला आणि तरुणी गरबा खेळण्याचा सराव करत होत्या. त्याचवेळी दोन महिला आणि चार पुरुष धर्मशाळेत घुसले. त्यापैकी एकाच्या हातात पिस्तूल होते. आरोपींनी लगेच चंदा नावाच्या तरुणीला पकडले आणि तिला ओढत बाहेर नेले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, इतर महिलांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण अपहरणकर्त्यांनी त्यांना धक्के मारून दूर केले.
२ तासांत पोलिसांची यशस्वी कारवाईया घटनेची माहिती मिळताच मंदसौरचे पोलीस अधीक्षक विनोद मीना यांनी तात्काळ अनेक पथके तयार केली. पोलिसांनी वेगाने तपास करत अवघ्या दोन तासांत तरुणीला सुखरूप ताब्यात घेतले. तसेच, या प्रकरणात सहभागी असलेल्या दोन महिलांसह सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अपहरणमागे हे आहे कनेक्शनपोलिसांच्या प्राथमिक तपासात या अपहरणमागे एक वेगळेच कारण समोर आले आहे. ज्या तरुणीचे अपहरण झाले, तिचे लग्न झाले होते, परंतु ती आपल्या पतीला सोडून मंदसौरमधील दुसऱ्या एका तरुणासोबत राहत होती. याच कारणामुळे, तिच्या माहेरच्या आणि सासरच्या लोकांनी एकत्र येऊन तिच्या अपहरणाचा कट रचला होता.
पोलीस अधीक्षक विनोद मीना यांनी सांगितले की, महिला आणि मुलींची सुरक्षा ही पोलिसांची सर्वोच्च प्राथमिकता आहे. अशा घटना कोणत्याही परिस्थितीत सहन केल्या जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या पोलीस आरोपींची कसून चौकशी करत असून, यामागील संपूर्ण कारण लवकरच समोर येईल अशी शक्यता आहे.