Pahelgam Terrorist Attack :जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. पहलगाममधल्या हल्ल्यानंतर दहशतवादी सुरक्षा दलांच्या निशाण्यावर आहेत. लष्कराने खोऱ्यात सक्रिय असलेल्या लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या १४ स्थानिक दहशतवाद्यांची यादी तयार केली आहे. खोऱ्यातून हे स्थानिक दहशतवादी पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करत असल्याचे समोर आलं आहे. त्यानंतर सुरक्षा दलांनी आतापर्यंत पुलवामा, कुलगाम, शोपियान आणि अनंतनागसह अनेक भागात दहशतवाद्यांची ९ घरे पाडली आहेत. यामध्ये आदिल हुसेन थोकर याचाही समावेश आहे.
आतापर्यंतच्या तपासात अनंतनाग येथील आदिल हुसेन थोकर हा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड होता असं म्हटलं जात आहे. आदिलने लष्कर-ए-तोयबाच्या पाकिस्तानमधल्या कमांडर्सच्या सहकार्याने या हल्ल्याची योजना आखली होती. आदिल एकेकाळी शिक्षक होता, पण हळूहळू तो कट्टरतावादाकडे झुकला आणि दहशतवादी झाला. या हत्याकांडात सहभागी असलेला आदिल २०१८ मध्ये पाकिस्तानला गेल्याची माहिती पुढे आली आहे.
अनंतनाग येथील खानाबल येथील सरकारी पदवी महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर आदिलने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू) मधून पदव्युत्तर पदवी घेतली होती. एकेकाळी हुशार विद्यार्थी म्हणून असलेला आदिल हुसेन थोकर आता २६ पर्यटकांचा बळी घेणाऱ्या दहशतवादी हल्ल्यामागील सूत्रधारांपैकी एक मानला जात आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना तो अर्धवेळ शिक्षक म्हणूनही काम करत होता.
आदिल २९ एप्रिल २०१८ रोजी परीक्षेसाठी बडगामला गेल्यानंतर बेपत्ता असल्याचे त्याचे कुटुंबिय आणि गावकरी सांगतात. मात्र गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार आदिल अभ्यासासाठी विद्यार्थी व्हिसावर पाकिस्तानला गेला होता, जिथे तो कट्टरपंथी नेत्यांना भेटला आणि देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाला. त्याने २०२४ मध्ये नियंत्रण रेषा ओलांडून जम्मू आणि काश्मीरला परतण्यापूर्वी दहशतवादी प्रशिक्षण घेतल्याचा आरोप आहे.
आदिलची आई शहजादा बानो यांनी सांगितले की, २९ एप्रिल २०१८ रोजी आदिलने बडगामला जात असल्याचे सांगितले तेव्हापासून त्याचा काहीही पत्ता लागलेला नाही. त्यानंतर, त्याचा फोन बंद झाला. आम्ही तीन दिवसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. जर तो यामध्ये सामील असेल तर सुरक्षा दलांनी त्याच्यावर कारवाई करावी. शहजादा बानो यांनी आदिलला आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले जेणेकरून त्यांचे कुटुंब शांततेत राहू शकेल.
पहलगाममधील हल्ल्यानंतर, लष्कराने गुरी गावातील त्याच्या कुटुंबाचे घर पाडले. नंतर लष्कराने ढिगारा बाजूला केला तेव्हा न फुटलेला शस्त्रसाठा सापडल्याचे सांगण्यातआले. जम्मू काश्मीर पोलिसांनी आदिल आणि हल्ल्यातील इतर संशयितांची माहिती देणाऱ्यांना २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.